एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू
एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू
गोरेगावमधील भगतसिंगनगरमधील दुमजली घराला आग
मुंबई, ता. १० : गोरेगाव पश्चिम येथील भगतसिंगनगर परिसरात शनिवारी (ता. १०) पहाटे एका दुमजली घराला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका १२ वर्षीय मुलाचा आणि १९ वर्षीय तरुणीचा समावेश असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव (प.) येथील राजाराम लेन, जनता स्टोअर्सजवळील भगतसिंगनगरमधील एका तळ अधिक एक मजल्याच्या घराला पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग तळमजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंग आणि घरातील साहित्याला लागली होती, जी वेगाने पहिल्या मजल्यापर्यंत पसरली. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच स्थानिक नागरिकांनी पाण्याच्या बादल्यांच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी विद्युत पुरवठा खंडित करून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. पहाटे ३.१५च्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. या आगीच्या विळख्यात पहिल्या मजल्यावर राहणारे तीन जण अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी या तिघांनाही बाहेर काढून पोलिस व्हॅन आणि खासगी वाहनाद्वारे तत्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले; मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी या तिघांनाही मृत घोषित केले. हर्षदा पावसकर (वय १९), कुशल पावसकर (१२) आणि संजोग पावसकर (४८) अशी मृतांची नावे आहेत.
शॉर्टसर्किटमुळे आग!
प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. तळमजल्यावरील इलेक्ट्रिक वायरिंगला आग लागल्याने धुराचे लोट आणि ज्वाळांनी वरच्या मजल्याला वेढले, ज्यामुळे या तिघांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे ते आत अडकले. स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दल या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. या भीषण घटनेमुळे भगतसिंगनगर परिसरात शोककळा पसरली असून, झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्रातील अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

