

निवडणूक प्रचारातून धारावी पुनर्विकासाचा मुद्दा गायब
ना काँग्रेस, ना ठाकरे गटाकडून आक्रमक प्रचार; लोकसभा, विधानसभेचा ट्रेंड दिसेना
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटासह सर्वच विरोधकांच्या अजेंड्यावर धारावी पुनर्विकासाचा मुद्दा होता. सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारातून मात्र धारावी पुनर्विकासाचा मुद्दा काहीसा गायब झाला असून, हिंदू-मुस्लिम, मराठी, उत्तर भारतीय हे मुद्दे असल्याचे चित्र आहे.
स्थानिक निवडणूक असल्याने विरोधकांनी आवाज उठवल्यास येथील रहिवाशांच्या पदरी आणखी काही पडेल, अशी अपेक्षा होती. पण कोणीच अपेक्षित आवाज उठवताना दिसत नसल्याने धारावीकर पालिका निवडणुकीत कोणाला साथ देणार, याकडे लक्ष लागले आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीचा पुनर्विकास करताना प्रत्येक झोपडीधारकाला ५०० चौरस फुटाचे धारावीतच घर मिळाले पाहिजे. पात्र-अपात्रतेचा खेळ नको, धारावीबाहेर पुनर्वसन नको, अशा रहिवाशांच्या मागण्या आहेत. त्याला काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे. त्यानुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आवाज उठवला होता. त्यामुळे पालिका निवडणुकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी धारावीचा मुद्दा असेल, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतील, असे दिसत होते. मात्र सत्ताधारी आणि विरोधकांच्या अजेंड्यावर मराठी-हिंदू, मुस्लिम, उत्तर भारतीय हेच मुद्दे आहेत. त्यामुळे धारावी पुनर्विकासाचा मुद्दा काहीसा मागे पडल्याचे चित्र आहे. दरम्यान, धारावीकरांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला तर विधानसभेत काँग्रेसला भरभरून मते दिलेली असतानाही आता धारावीचा मुद्दा थंड का, असा सवाल केला जात आहे.
प्रत्येक धारावीकराला धारावीतच ५०० चौरस फुटाचे घर मिळावे, यासाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत मोठा आवाज उठवला होता. मात्र सध्या त्या प्रमाणात आवाज उठवला जात नाही. त्यामुळे सर्वच पक्षांनी धारावी प्रश्नावर आणखी आवाज उठवत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
- राजू कोरडे, समन्वयक, धारावी बचाव आंदोलन
धारावी विधानसभेतील महापालिकेचे एकूण सात प्रभाग
- १८३ - माटुंगा लेबर कॅम्प, धारावी मुख्य रोड परिसर - १८४ - शाहू नगर, धारावी कोळीवाडा
- १८५ - कुंभारवाडा, राजीव गांधी नगर, ट्रान्झिट कॅम्प - १८६ - मुकुंद नगर, सोशल नगर
- १८७ - ९० फूट रोड, मुस्लिम नगर
- १८८ - शास्त्री नगर, पीएमजीपी कॉलनी
- १८९ - माहीम पूर्व आणि धारावीचा काही सीमावर्ती भाग
लोकसभा निवडणुकीत धारावी विधानसभेतून मिळालेली मते
- अनिल देसाई (शिवसेना उबाठा) - ७६,६७७
- राहुल शेवाळे (शिवसेना शिंदे गट) - ३९,८२०
- मिळालेली आघाडी - ३६,८५७
विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते
- डॉ. ज्योती गायकवाड (काँग्रेस) - ७०,७२७
- राजेश खंदारे शिवसेना - ४७,२६८
- मिळालेली आघाडी - २३,४५९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.