विकासाच्या मुद्द्याला चांगले यश

विकासाच्या मुद्द्याला चांगले यश

Published on

विकासाच्या मुद्द्याला चांगले यश
२५ वर्षांनंतर शिवसेनेच्या हातातून मुंबई निसटली
मुंबई, ता. १६ ः भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट, रिपब्लिकन पक्ष यांच्या युतीला महापालिकेत मिळालेले यश हे विकासाच्या मुद्द्याला मिळालेले निर्विवाद मत आहे. त्यामुळे २५ वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महापालिका खेचून घेण्याचे स्वप्न अखेर भाजपने पूर्ण केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्राण मुंबई महापालिकेत असल्याने ती आता ठाकरे यांच्याकडून खेचून घ्यायची, असा चंग भाजपने बांधला होता. एकीकडे २५ वर्षांतील महापालिकेतील भ्रष्टाचार, गैरकारभार, त्यामुळे झालेले मुंबईकरांचे हाल हे दाखवून देताना दुसरीकडे आपण आतापर्यंत राबवलेले विकास प्रकल्प तसेच भविष्यात त्याचे मुंबईकरांना मिळणारे फायदे या गोष्टीवरही भाजपने चाणाक्षपणे भर देऊन दोन्ही मुद्द्यांचा समन्वय साधला. विशेषतः मोदी-शहा या गुजराती नेत्यांच्या तालावर नाचणारी मुंबई-महाराष्ट्र भाजप असा शिक्का आपल्यावर बसू नये आणि आपल्या विरोधात आणि शिवसेना-मनसे यांच्या बाजूने मराठी मतांचे ध्रुवीकरण होऊ नये, यासाठीही भाजपने चाणाक्ष रणनीती आखली. मुंबईतील प्रचाराचा भर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि काही प्रमाणात प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर, राम कदम या मराठी नेत्यांवरच ठेवला होता. केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पीयूष गोयल यांना बोरिवलीपुरतेच मर्यादित ठेवले होते. त्याचा फायदा भाजपला मिळाला. एकीकडे उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याबद्दल त्यांच्यावर प्रखर टीका करताना मुस्लिम मते आपल्याविरोधात जाणार नाहीत, याचीही काळजी भाजपने घेतली. या सगळ्यांचे फळ म्हणून त्यांना काठावर का होईना; पण महापालिका ताब्यात घेण्यात यश आले आहे.
भाजपच्या धोरणीपणामुळे ठाकरे बंधूंना मराठीचा मुद्दा एका मर्यादेपर्यंतच चालवता आला. खुद्द मुख्यमंत्र्यांनीही प्रत्येक सभेत विकासाचाच मुद्दा लावून धरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीच्या मराठी प्रेमाबद्दल बोलत होते. अटल सेतू, नवी मुंबई विमानतळ, कोस्टल रोड, बीडीडी चाळ पुनर्वसन, अभ्युदयनगर पुनर्वसन, रमाबाई आंबेडकरनगर पुनर्वसन या मुद्द्यांवरच भाजप शिवसेनेचे मराठी नेते भर देत होते. ठाकरे बंधूंच्या शिवाजी पार्कवरील सभेमुळे ठाकरे बंधूंना फायदा होईल, असे वातावरण होते; मात्र त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महायुतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावर तुफानी हल्ला चढवून पुन्हा वातावरण फिरवले. उद्धव ठाकरेंचे फसलेले हिंदुत्व, उद्धव-राज यांच्यामधील जुनी भांडणे, हिंदी सक्तीचे उद्धव ठाकरेंचे धोरण, धारावी पुनर्वसनातील पारदर्शकता, अदाणी यांना देशातील भाजपेतर सरकारांनीही दिलेले आमंत्रण, केवळ अदाणीच नव्हे, तर सर्वच व्यवसाय समूहांची झालेली भरभराट हे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी मांडून उद्धव यांच्या आक्षेपांमधील हवाच काढून घेतली.
मोदी-शहा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रभावामुळे मुंबईतील गुजराती आणि उत्तर भारतीय आता ठामपणे भाजपच्या बाजूने उभे आहेत. एकीकडे भाजपने हिंदुत्व आणि मराठीचे कैवारी आपणच असल्याचे भासवून, दुसरीकडे उत्तर भारतीय, गुजराती उमेदवारांनाही उमेदवारी दिल्यामुळे त्यांनी सर्व भाषिक समीकरणे अचूकतेने साधली. काँग्रेसचा आतापर्यंत पाठीराखा असलेला उत्तर भारतीय, गुजराती मतदार भाजपकडे सरकल्याने काँग्रेसची मोठीच अडचण झाली आहे.
---
स्थानिक नेतृत्वावर विजय
पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री किंवा बड्या राज्यांचे मुख्यमंत्री आदी मोठे नेते प्रचाराला आले नाहीत. तरीही स्थानिक भाजपने नेतृत्वाने स्वबळावर हा विजय मिळवला आहे. शिंदे सेनेची ताकद मर्यादित असली तरी त्या दोन्ही पक्षांना एकमेकांचा फायदा झालाच.
अर्थात दादर, परळ, लालबाग हा मध्य मुंबईतील शिवसेनेचा मराठीबहुल बालेकिल्ला भेदणे भाजपला जमले नाही, हेदेखील तितकेच खरे. संख्येच्या दृष्टीने पाहिले तर एवढी आदळआपट करूनही मागील महापालिका निवडणुकीपेक्षा भाजपला फारसा फायदा झाला नाही, हेदेखील तितकेच खरे. त्यात शिंदे सेनेचीही त्यांना थोडीफार का होईना मदत मिळाली, हेदेखील नाकारता येत नाही.
-----
स्थलांतराकडे शिवसेनेचे दुर्लक्ष
आतापर्यंत मराठी माणसाच्या मुंबईबाहेर होणाऱ्या स्थलांतराकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले. तसेच आपल्याकडे आलेला मुंबईतील गुजराती आणि उत्तर भारतीय मतदार काँग्रेसकडे जाणार नाही, याचीही भाजपला काळजी घेणे जरूरी आहे. अन्यथा या मतविभागणीचा फायदा शिवसेनेला मिळून त्यांना पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com