ईशान्य मुंबईत भाजपची घोडदौड रोखली
ईशान्य मुंबईत भाजपची घोडदौड रोखली
मराठी मतदारांचा दबदबा; समाजवादी, राष्ट्रवादीचा सुपडा साफ
जयेश शिरसाट
मुंबई, ता. १७ : ईशान्य मुंबईतील मराठी मतदारांनी भाजपची घोडदौड रोखल्याचे महापालिका निवडणूक निकालावरून स्पष्ट होते. येथील मतदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेला नाकारले. सोबतच समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचाही सुपडा साफ केला.
ईशान्य मुंबईतील लोकसभा मतदारसंघात महापालिकेचे ४० प्रभाग आहेत. २०१७ मध्ये सर्व पक्ष स्वतंत्र लढले. त्यात भाजपचे १३, शिवसेनेचे (फाटाफुटीआधी) १५, मनसे आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन, राष्ट्रवादीचे चार तर समाजवादीचे पाच नगरसेवक निवडून आले होते. निवडणुकीनंतर शिवसेना-भाजप युतीने महापालिकेत सत्ता स्थापन केली. मधल्या काळात मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत सामील झाले. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीचे २९ नगरसेवक होते.
शिवसेना, राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्यानंतर, शिवसेना महायुतीतून बाहेर पडल्यानंतर झालेल्या यंदाच्या लढतीत भाजपला १५ आणि शिवसेनेला (शिंदे गट) अवघ्या चार प्रभागांत विजय मिळवता आला. त्यामुळे भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन महापालिकेत सत्ता स्थापन केल्यास महायुतीचे १९ नगरसेवक या मतदारसंघात असतील.
या मतदारसंघात ठाकरे गटाने १२, तर मनसेने दाेन प्रभाग जिंकले. काँग्रेसला एका प्रभागात यश मिळाले. समाजवादी आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या पदरी भोपळा आला. मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या भांडुप, विक्रोळी आणि घाटकोपर पश्चिम येथील एकूण २० पैकी १३ प्रभाग ठाकरे बंधूंनी जिंकले आहेत. भाजपला पाच, शिंदे सेनेला एकच प्रभाग जिंकता आला.
मुलुंड, घाटकोपर पूर्व या गुजराती मतदारांचे, तर मानखुर्द-शिवाजीनगर येथील मुस्लिम आणि उत्तर भारतीयांचे वर्चस्व असलेल्या उर्वरित २० प्रभागांपैकी भाजपने १०, शिंदे सेनेने तीन जिंकले. ठाकरे गटाला एकाच प्रभागात विजय मिळवता आला.
खिंडार पडता पडता राहिले
मुलुंड भाजपचा अभेद्य किल्ला मानला जातो. गेल्या लढतीप्रमाणे यंदाही भाजपने येथील सहाच्या सहा प्रभाग जिंकले. येथील प्रभाग १०६मधील लढत अत्यंत चुरशीची झाली. महापौरपदाचे प्रबळ दावेदार, माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे (११,८९७) यांना कडवी झुंज देताना मनसेचे सत्यवान दळवी (११,७३३) अवघ्या १६४ मतांनी पराभूत झाले.
प्रतिष्ठा धुळीस
- भांडुपमध्ये शिवसेना (शिंद गट) आमदार अशोक पाटील यांनी आपले चिरंजीव रूपेश यांना रिंगणात उतरवले होते. मतदारांनी त्यांना नाकारून ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका दीपमाला बढे यांना कौल दिला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आग्रह करून मागितलेला प्रभाग मनसेने जिंकला. पक्षाचा आमदार असूनही येथे शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही.
अस्तित्वच संपले
ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काॅँग्रेसचे चार तर समाजवादी पक्षाचे पाच नगरसेवक होते. यंदा समाजवादीसह राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना येथून एकही उमेदवार निवडून आणता आला नाही. मानखुर्द-शिवाजीनगर मतदारसंघातील नऊपैकी एमआयएमने पाच प्रभाग जिंकून आपली ताकद दाखवून दिली. मुस्लिम मते पारड्यात पडतील, हा अंदाज बांधून ठाकरे गटाने येथे उमेदवार दिले होते; मात्र येथील मुस्लिम मतदारांनी एमआयएमवर विश्वास दाखवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

