जागा वाढल्या; पण भाजपचा मतटक्का घसरला!
जागा वाढल्या; पण भाजपचा मतटक्का घसरला!
शिवसेना ठाकरे गटासह सर्वच पक्षांना फटका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : महापालिका निवडणुकीत ८९ जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मित्रपक्षाच्या मदतीने सत्तेचे संख्याबळही प्राप्त केले असले, तरी २०१७च्या तुलनेत यंदा भाजपच्या एकूण मतांची टक्केवारी घटल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. केवळ भाजपच नव्हे, तर शिवसेनेसह (ठाकरे गट) अनेक प्रमुख पक्षांच्या मतांच्या टक्केवारीला गळती लागली आहे.
महापालिकेच्या ताज्या निकालांनी मुंबईच्या राजकारणात मोठे फेरबदल घडवून आणले आहेत. २०१७मध्ये अटीतटीची लढत देणाऱ्या शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय दरी स्पष्ट झाली आहे. भाजपने जागांच्या संख्येत मोठी मजल मारली असली, तरी एकूण मतांचा टक्का घसरल्याने त्यांच्यासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे. भाजपच्या विजयी उमेदवारांना मिळालेल्या मतांचा विचार केल्यास ही टक्केवारी ४५.२२ टक्के इतकी आहे.
भाजपची मतांची पकड
२०१७ मध्ये भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते, तेव्हा भाजपने २७.३२ टक्के मते मिळवली होती. २०२५च्या निवडणुकीत भाजपची एकूण मतदानातील टक्केवारी २१.५८ टक्के दिसत असली, तरी त्यांच्या विजयी उमेदवारांनी तब्बल ४५ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवली आहेत. यावरून भाजपच्या उमेदवारांनी अत्यंत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवल्याचे स्पष्ट होते.
शिवसेनेत फूट अन् मतविभाजन
२०१७मध्ये शिवसेना २८.२९ टक्के मतांसह सर्वात मोठा पक्ष होता. पक्षातील फुटीनंतर २०२५मध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला १३.१३ टक्के, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच टक्के मते मिळाली आहेत. दोन्ही गट मिळून शिवसेनेची एकत्रित १८.१३ टक्के आहे. २०१७च्या तुलनेत यामध्ये १० टक्क्यांची मोठी घट झाली आहे.
काँग्रेस, मनसेचीही घसरण
मुंबईत काँग्रेसची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. २०१७मधील १५.९४ टक्क्यांवरून काँग्रेस थेट ४.४४ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. राज ठाकरे यांच्या मनसेचा मतटक्का ७.७३ टक्क्यांवरून १.३७ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
एमआयएमची कामगिरी
‘एमआयएम’ने २०१७मध्ये दाेन जागा जिंकल्या होत्या. त्यांनी आता मुसंडी मारून आठ जागा पटकावल्या आहेत. यामुळे त्यांची मतांची टक्केवारी १.२५ टक्क्यापर्यंत सुधारली आहे. २०१७च्या तुलनेत २०२५-२६च्या निवडणुकीत मतदारांनी भाजपला स्पष्ट पसंती दिली आहे. शिवसेनेच्या मतांचे झालेले विभाजन आणि काँग्रेसचा कमी झालेला प्रभाव यामुळे मुंबई महापालिकेत आता भाजप आणि शिंदे यांची शिवसेना या नव्या महायुतीचे वलय निर्माण झाले आहे.
........
मतांची तुलनात्मक टक्केवारी
पक्ष : २०१७ : २०२६
भाजप : २७.३२ : २१.५८
शिवसेना : २८.२९ : १३.१३
काँग्रेस : १५.९४ : ४.४४
मनसे : ७.७३ : १.३७
राष्ट्रवादी काॅँग्रेस : ४.९१ : ०.६२
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

