मुंबईत ''नोटा'' चा विजय!
८७ हजार मतदारांचा नोटास्त्र
तीन प्रभागांत एक हजारहून अधिक मते; प्रभाग २२६ मध्ये सर्वाधिक रोष
बापू सुळे : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : मुंबई महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत यंदा अनेक राजकीय दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला असला, तरी ‘नोटा’चा प्रभाव मात्र लक्षणीयरीत्या वाढलेला दिसून आला आहे. मुंबईतील २२७ प्रभागांमध्ये तब्बल ८७,०१३ मतदारांनी कोणालाही मतदान न करता ‘नोटा’चा पर्याय निवडला आहे. मतांच्या या आकड्याने राजकीय पक्षांपुढे मोठे प्रश्नचिन्ह उभे केले असून, ‘नोटा’ला मिळालेल्या एकूण मतांनी निवडणुकीत पाचव्या क्रमांकाचे स्थान पटकावले आहे. प्रभाग क्रमांक २२६ मध्ये १४०४ मते नोटाला मिळाली आहेत. याशिवाय इतर दोन प्रभागांत एक हजारहून अधिक मते पडली असून, इतरत्र मतांचा टक्का चांगला आहे. नोटाला भरभरून झालेल्या मतदानावरून निवडणूक रिंगणातील उमेदवार मुंबईकरांना फारसे पसंत पडले नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईच्या निवडणूक रिंगणात २२७ प्रभागांतून शिवसेना ठाकरे, भाजप, शिवसेना, काँग्रेस अशा प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह इतर पक्षांचे आणि अपक्ष असे १७०० उमेदवार निवडणूक लढवत होते, तर एक कोटी तीन लाखांहून अधिक मतदार होते. निवडणूक रिंगणात मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने यंदा मतदरांसमोर पर्याय उपलब्ध होते. त्यामुळे मतदार वरीलपैकी कोणीही नाही (नोटा) हा पर्याय कमी प्रमाणात निवडतील, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून लावला जात होता. मात्र, प्रत्यक्षात चित्र उलटे झाले असल्याचे मतमोजणीनंतर समोर आले आहे. अनेक पक्षांच्या उमेदवारांहून अधिक मते नोटाला मिळाली आहेत. त्यावरून मुंबईकर निवडणूक रिंगणातील उमेदवारांबाबत समाधानी नव्हते, असेच चित्र आहे.
निषेधाचे अस्त्र
पालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी पक्षाचे अधिकृत तिकीट मिळवण्यासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत उमेदवारी मिळवली होती. काही जण तर शेवटच्या दोन तासांत भलत्याच पक्षाकडून तिकीट मिळवत निवडणूक रिंगणात उतरले होते. हा राजकीय चिखल आणि उमेदवारांच्या उड्या मारण्याची वृत्ती पसंत न पडल्याने अनेक सुशिक्षित मतदारांनी निषेध म्हणून नोटाला मतदान केले असणार आहे. त्यामुळेच आतापर्यंतची सर्वाधिक मते नोटाला मिळाल्याचा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.
पाचव्या क्रमांकाची मते
पालिका निवडणुकीत नोटाला मिळालेल्या एकूण मतांचा विचार करता सुमारे पावणेदोन टक्के आहेत. नोटाला ८७ हजार मते पडली आहेत, तर विजयी झालेल्या उमेदवारांच्या मतांचा विचार केल्यास भाजप, शिवसेना ठाकरे, शिवसेना, काँग्रेसनंतरची पाचव्या क्रमांकाची मते नोटाकडे आहेत.
या प्रभागात नोटाला सर्वाधिक पसंती
प्रभाग क्रमांक नोटा मते प्रभाग क्रमांक नोटा मते
प्रभाग २२६ १,४०४ प्रभाग १०८ ९२६
प्रभाग १०७ १,१७९ प्रभाग ११ ९११
प्रभाग १५ १,१३२ प्रभाग १८ ८९१
प्रभाग ४७ ९८० प्रभाग २१ ८६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

