(मुंबई टुडेसाठी)प्रगत उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये संशोधन व नवोन्मेषचे नवे पर्व
शैक्षणिक विभागात संशोधनाला बळ
मुंबई विद्यापीठाचे प्रकल्पामार्फत उद्दिष्ट
मुंबई, ता. १८ : मुंबई विद्यापीठात आगामी पाच वर्षांसाठी प्रगत साहित्य ऊर्जा व शाश्वतता तसेच इंडस्ट्री ४.० या तीन प्रमुख प्रगत उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये संशोधन व नवोन्मेष साध्य करण्याचे उद्दिष्ट प्रकल्पामार्फत ठेवण्यात आले आहे. ही प्रगत उद्योन्मुख क्षेत्र राष्ट्रीय संशोधन प्राधान्यक्रमांशी सुसंगत असून, भविष्यातील उदयोन्मुख तंत्रज्ञान म्हणून त्यांचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याचा विश्वास विद्यापीठाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमासाठी १०० कोटींच्या एकूण निधीतून हब-स्पोक मॉडेल अंतर्गत मुंबई विद्यापीठाला २० कोटींचा सर्वाधिक निधी मिळालेला असून, हे एकमेव स्पोक संस्थेचे वैशिष्ट्य ठरले असल्याचेही सांगण्यात आले.
अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (एएनआरफ) यांनी मागील वर्षाच्या अखेरीस पार्टनरशीप फॉर ॲक्लेरेटेड इनोव्हेशन अँड रिसर्च (पीएआयआर) उपक्रमाची सुरुवात केली. देशातील संशोधन व नवोन्मेष प्रक्रियेला गती देण्यासाठी सुप्रस्थापित, अग्रगण्य संशोधन संस्थांना हब म्हणून आणि केंद्रीय, राज्य सार्वजनिक विद्यापीठांना स्पोक म्हणून जोडणारी भागीदारी बळकट करणे, हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. या स्पर्धात्मक उपक्रमांतर्गत, राष्ट्रीय स्तरावरील क्रमवारीत आपली क्षमता सिद्ध केलेल्या मुंबई विद्यापीठाची स्पोक संस्थांपैकी एक म्हणून निवड झाली असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. तसेच आयआयटी-मुंबई या हब संस्थेसह या प्रतिष्ठित उपक्रमासाठी एकूण १०० कोटींचा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला असून, पीएआयआर-एएनआरफ या प्रकल्पांतर्गत प्रस्तावित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, मुंबई विद्यापीठाने नऊ कोटींहून अधिक निधी अत्याधुनिक संशोधन उपकरणांच्या खरेदीसाठी गुंतविण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रगत उपकरणांचा समावेश
स्पार्क प्लाझ्मा सिण्टरिंग फर्नेस, इंडक्टिव्ह कपल्ड प्लाझ्मा ऑप्टिकल एमिशन स्पेक्ट्रोस्कोप, तापमान-आधारित स्पेक्ट्रो-फ्ल्युरोमीटर (लाइफटाइम मोजणीसह), उच्च क्षमतेचे वर्कस्टेशन व सर्व्हर्स, ग्लोव्ह-बॉक्स, बॅटरी-कॉईल सेल फॅब्रिकेशन यंत्रणा, युव्ही-व्हीआयएस स्पेक्ट्रोमीटर, इलेक्ट्रो-ल्युमिनेसन्स मोजणी प्रणाली, २-डी प्रिंटिंग डिस्पेंसर, हीटिंग व कूल्ड सर्क्युलेटिंग पाथ कॅपसह ग्लास डिस्टिलेशन असेंब्ली आदी अनेक प्रगत उपकरणांचा समावेश आहे.
नियुक्ती प्रक्रिया
उपक्रमाचा एक भाग म्हणून, अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशनकडून मंजूर करण्यात आलेल्या २० संशोधन कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी मुंबई विद्यापीठाची नियुक्ती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. यामध्ये एक वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, एक प्रधान प्रकल्प सहकारी, दोन एनपीडीएफएस, पाच वरिष्ठ संशोधन फेलो, आठ कनिष्ठ संशोधन फेलो, दोन प्रकल्प सहकारी तसेच एक फील्ड सहाय्यक यांचा समावेश आहे.
सुदृढ संशोधनाला बळकटी
उपक्रमाच्या माध्यमातून, विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांतील संशोधन वृद्धिंगत करणे, तरुण पिढीत प्रगत संशोधन संस्कृती रुजविणे, देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेल्या उच्च कौशल्ययुक्त मनुष्यबळाच्या निर्मितीत योगदान देणे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुदृढ संशोधन सहकार्य बळकट करणे, या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने हा उपक्रम राबवला आहे.
फोटो - 664
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

