मुंबई महापालिकेला ''बहुभाषिक चेहरा''

मुंबई महापालिकेला ''बहुभाषिक चेहरा''

Published on

मुंबई महापालिकेला ‘बहुभाषिक चेहरा’
मराठी टक्का अबाधित; मात्र महापालिकेचे स्वरूप बदलले
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १९ : महापालिकेच्या रणांगणात उडालेला धुरळा शांत झाला असून निकालाचे आकडे मुंबईच्या बदलत्या राजकीय आणि सामाजिक समीकरणावर शिक्कामोर्तब करीत आहेत. यावेळच्या सभागृहात १४६ मराठी नगरसेवकांसह मुंबईचा ‘मराठी बाणा’ कायम असला तरी २१ गुजराती, १७ हिंदी भाषक आणि ३२ मुस्लिम नगरसेवकांसह ७० नगरसेवक निवडून आले असून, मुंबईचे बहुभाषिक स्वरूप अधिक गडद केले आहे. मुंबईच्या राजकारणाचा कणा असलेला मराठी मतदार अद्याप निर्णायक भूमिकेत आहे. शिवसेना (ठाकरे गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप या तिन्ही प्रमुख पक्षांनी मराठी चेहऱ्यांना झुकते माप दिले. विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, यशवंत किल्लेदार आणि अमेय घोले यांसारख्या अनुभवी नावांसह अंकित प्रभू आणि राजुल पाटील यांसारख्या युवा/वारसदार चेहऱ्यांनी ‘मराठी टक्का’ भक्कम ठेवला आहे.

​मुंबईतील व्यापारीवर्ग आणि उत्तर भारतीय मतदारांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. २१ गुजराती आणि १७ हिंदी भाषक नगरसेवकांच्या निवडीमुळे भाजप आणि शिवसेनेच्या गटांना मोठा दिलासा मिळाला आहे.​ विशेषत: नील सोमय्या, आकाश पुरोहित आणि पंकज यादव यांसारख्या उमेदवारांनी आपल्या समाजाच्या मतांचे यशस्वी ध्रुवीकरण केल्याचे दिसून येते.

मुस्लिम प्रतिनिधित्वात मोठी वाढ
निवडणुकीत ३२ मुस्लिम नगरसेवक निवडून येणे ही मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे. समाजवादी पक्ष, काँग्रेस आणि काही अंशी शिवसेना ठाकरे गटाच्या गोटातून हे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे महापालिकेच्या धोरणात्मक निर्णयांत या गटाचा प्रभाव वाढणार आहे. आगामी महापौर निवडीत आणि पालिकेच्या समित्यांच्या वाटपात या भाषक आणि धार्मिक गटांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मुंबईच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल आता केवळ एका ठरावीक वर्गाकडे न राहता तो विभागला गेल्याचे हे चित्र आहे.

दक्षिणात्य आणि ख्रिश्चन समुदायाची उपस्थिती
​मुंबईच्या कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचे दर्शन घडवत ११ दाक्षिणात्य आणि ख्रिश्चन उमेदवार निवडून आले. यात ट्युलीप मिरांडा, तेजिंदरसिंग तिवाना यांचा समावेश आहे.
मराठी १४६ - संपूर्ण मुंबई (विशेषतः दादर, परळ, गिरगांव, उपनगर)
मुस्लिम ३२ - भायखळा, कुर्ला, मानखुर्द
गुजराती २१ - घाटकोपर, मुलुंड, कांदिवली, विलेपार्ले
हिंदी भाषक १७ - मलाड, कांदिवली, कुर्ला (पूर्व)
दाक्षिणत्य/मिश्र ११ - सायन, चेंबूर, वांद्रे

नव्या युतीची नांदी
​राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या मते, या निकालांनी स्पष्ट केले आहे की मुंबईत केवळ एका भाषेच्या जोरावर सत्ता मिळवणे कठीण झाले आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना मराठी मतांसाठी संघर्ष करावा लागला, तर भाजपला गुजराती-हिंदी मतांसोबतच मराठी मतांची जोड घ्यावी लागली. ३२ मुस्लिम नगरसेवकांची संख्या ही प्रस्थापित पक्षांसाठी भविष्यातील धोक्याची घंटा किंवा नव्या युतीची नांदी ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com