तेरा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मिळाले हात, नव्या आयुष्याची सुरुवात!
१३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर मिळाले हात, नव्या आयुष्याची सुरुवात!
१८ वर्षीय प्रियंक आघेरावर दुर्मिळ द्विपक्षीय हात प्रत्यारोपण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : अपघातात दोन्ही हात गमावल्यानंतर आयुष्य थांबल्यासारखे झाले होते; मात्र आशा कधीच संपली नाही. गुजरातमधील राजकोट येथील १८ वर्षांचा प्रियंक आघेरा याच्यासाठी अखेर तो दिवस उजाडला, ज्याची तो गेल्या १३ महिन्यांपासून वाट पाहत होता. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात करण्यात आलेल्या दुर्मिळ द्विपक्षीय हात प्रत्यारोपणानंतर प्रियंकला पुन्हा स्वावलंबी होण्याची आणि आपल्या भविष्याची स्वप्ने पाहण्याची नवी उमेद मिळाली आहे.
राजकोट जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील प्रियंक याला जानेवारी २०२४ मध्ये शेतात काम करताना भीषण अपघात झाला. कापसाची काढणी सुरू असताना ट्रॅक्टरच्या ब्लेडमध्ये दोन्ही हात अडकून ते गंभीररीत्या चिरडले गेले. जीव वाचविण्यासाठी दोन्ही हात कापावे लागले. विद्युत अभियांत्रिकीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रियंकचे शिक्षण, दैनंदिन जीवन आणि भविष्यातील योजना एका क्षणात ठप्प झाल्या.
हात प्रत्यारोपणासाठी योग्य मृतदेह दाता उपलब्ध होणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. प्रियंक १३ महिने प्रतीक्षा यादीत होता. अखेर जानेवारी २०२६ मध्ये सुरत येथील ५० वर्षांच्या एका महिलेच्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर अवयवदानास संमती दिली. महिलेचे हात अवघ्या दोन तासांत मुंबईत आणण्यात आले. ९ आणि १० जानेवारीच्या रात्री सुमारे १३ तास चाललेल्या अत्यंत जटिल शस्त्रक्रियेत हा द्विपक्षीय हात प्रत्यारोपण उपचार यशस्वी झाला. या शस्त्रक्रियेचे नेतृत्व डॉ. नीलेश सतभाई यांनी केले. ही शस्त्रक्रिया नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी रुग्णालय येथे पार पडली.
डॉ. सातभाई यांनी सांगितले की, हात प्रत्यारोपणामुळे केवळ शारीरिक कार्यक्षमता परत मिळत नाही, तर रुग्णाचा आत्मसन्मान, स्वावलंबन आणि भविष्याबाबतचा आत्मविश्वासही पुनर्स्थापित होतो. सध्या प्रियंक वैद्यकीय देखरेखीखाली असून, पुनर्वसन प्रक्रिया सुरू आहे. दीर्घ आणि कष्टदायक असले तरी पुन्हा स्वावलंबी होण्याचा मार्ग त्याच्यासाठी खुला झाला आहे.
अपघातानंतर सर्व काही संपले असे वाटले होते. मात्र, डॉक्टरांनी आशा दिली. १३ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर हा दिवस आला आहे. पुढचा प्रवास कठीण आहे, पण आता पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळाले आहे.
- प्रियंक आघेरा, रुग्ण
आम्ही अनेक ठिकाणी उपचाराचे पर्याय पाहिले; परंतु डॉ. सतभाई यांचा अनुभव विश्वासार्ह वाटला. शस्त्रक्रियेसाठी प्रियंकने वजन कमी करण्यासह मोठे प्रयत्न केले. दाता कुटुंबाचे आम्ही आयुष्यभर ऋणी राहू.
- दिनेश आघेरा, वडील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

