

नव्या इलेक्ट्रिक बस सेवेत कधी?
१५ दिवसांपासून शिवाजीनगर आगारात धूळखात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील प्रवाशांना अपुऱ्या बससेवेमुळे मनस्ताप सहन करावा लागत असताना, बेस्टच्या ताफ्यात सामील होण्यासाठी आलेल्या २० नवीन इलेक्ट्रिक बस गेल्या १५ दिवसांपासून शिवाजीनगर आगारात धूळखात उभ्या आहेत. बसवर नंबर टाकणे (स्टेन्सिल वर्क), महिलांसाठीच्या राखीव जागांची माहिती आणि इतर अंतर्गत सजावटीची किरकोळ कामे सुरू असल्याने त्या ताफ्यात घेतलेल्या नाहीत, असे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.
या बस ताफ्यात दाखल होण्यासाठी सर्व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्या असल्या तरी, काही किरकोळ कामे आणि राजकीय सोपस्कारांमुळे त्या प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होऊ शकलेल्या नाहीत. शिवाजीनगर आगारात उभ्या असलेल्या या बस ओलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीने पुरवल्या आहेत. या बस ओल्या भाडेतत्त्वावर (वेटलिज) चालवल्या जाणार आहेत. बसवर नंबर टाकणे (स्टेन्सिल वर्क), महिलांसाठीच्या राखीव जागांची माहिती आणि इतर अंतर्गत सजावटीची किरकोळ कामे सुरू असल्याने त्या ताफ्यात घेतलेल्या नाहीत, असे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, नवनिर्वाचित नगरसेवकांची ‘बेस्ट समिती’ स्थापन होण्याची प्रतीक्षा केली जात आहे. पुढील ७ ते १० दिवसांत समिती स्थापन झाल्यानंतर या बसचा लोकार्पण सोहळा पार पडेल आणि त्यानंतरच त्या रस्त्यावर धावतील.
बेस्ट अभ्यासक सुहास नलावडे यांच्या मते, केवळ शिवाजीनगरच नव्हे, तर धारावी आगारातही २०१८-१९ मध्ये सुरू झालेल्या २५ हायब्रीड बस सध्या निकामी होऊन पडून आहेत. मात्र, बेस्ट प्रशासनाकडून अजूनही या बस ताफ्यात असल्याचे दाखवले जात आहे, जे चुकीचे आहे. बेस्टला तिकीटविक्रीतून दररोज २.५ ते ३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, इतर खर्च भागवण्यासाठी उपक्रमाला मुंबई महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागते. अशा परिस्थितीत, नवीन बस तातडीने रस्त्यावर येणे प्रवाशांसाठी आणि उत्पन्नासाठीही गरजेचे आहे.
बेस्ट प्रशासनाचे म्हणणे काय?
बसवर नंबर टाकणे (स्टेन्सिल वर्क), महिलांसाठीच्या राखीव जागांची माहिती आणि इतर अंतर्गत सजावटीची किरकोळ कामे सुरू असल्याने त्या ताफ्यात घेतलेल्या नाहीत, असे बेस्ट प्रशासनाचे म्हणणे आहे.
बसची संख्या कमी
एकीकडे मुंबईला ७,००० बसची गरज असताना, प्रत्यक्षात बेस्टच्या ताफ्यातील बसची संख्या निम्म्यावर आली आहे. सध्या बसचा ताफा २,७४४ (यापैकी २४९ बेस्टच्या मालकीच्या, तर २,४९५ ओल्या भाडेतत्त्वावर) असून, १५-१७ वर्षांपूर्वी बेस्टच्या ताफ्यात ४,८०० बस होत्या.
नोंदणी पूर्ण
या सर्व २० बसची नोंदणी ताडदेव आरटीओमध्ये पूर्ण झाली असून, रस्ते प्रवासासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या कंपनीकडे उपलब्ध आहेत. तरीही केवळ औपचारिकता आणि समितीच्या नामनिर्देशनामुळे प्रवाशांना या सेवेपासून वंचित रहावे लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.