महापौरपदाच्या आरक्षणात ‘फिक्सिंग’
महापौरपदाच्या आरक्षणात ‘फिक्सिंग’
सोडत प्रक्रियेवर विरोधकांचा हल्लाबोल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी जाहीर झालेल्या आरक्षणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे गट, मनसे आणि काँग्रेस या सर्वच विरोधी पक्षांनी या आरक्षणावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सत्ताधारी महायुतीने सोयीनुसार ही सोडत काढल्याचा आरोप केला आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे आरक्षण पारदर्शक नसून पूर्णपणे ‘मॅच फिक्सिंग’ आहे. सत्ताधारी पक्षाला जो उमेदवार सोयीचा आहे त्यानुसारच हे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. मुंबईच्या जनतेने ज्यांना नाकारले त्यांना मागच्या दाराने सत्तेत बसवण्यासाठी हा प्रपंच केला जात आहे,’ असे पेडणेकर म्हणाल्या.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनीही या प्रक्रियेवर संशय व्यक्त केला आहे. ‘आरक्षणाची सोडत ही नियमानुसार आणि लॉटरी पद्धतीने होणे अपेक्षित असते. सध्याची प्रक्रिया पाहता हे आधीच ठरल्यासारखे वाटते. प्रशासनाचा वापर करून सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हे आरक्षण फिरवले आहे,’ अशी टीका त्यांनी केली. काॅँग्रेसनेही या प्रक्रियेवर टीका केली आहे.
महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. अशा परिस्थितीत महापौरपदाचे आरक्षण विशिष्ट प्रवर्गासाठी निघाल्याने अनेक दिग्गजांची संधी हुकली आहे, तर काहींसाठी सत्तेचा मार्ग सुकर झाला आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
------
सर्व नियम धाब्यावर बसवून हे सरकार काम करीत आहे. मुंबई महापालिकेच्या आरक्षणात घालण्यात आलेला घोळ लोकशाहीसाठी घातक आहे. ही निव्वळ राजकीय गणित जुळवण्यासाठी केलेली मॅच फिक्सिंग असून, आम्ही याचा तीव्र निषेध करतो.
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

