मुंबईत आशियाई जलपक्षांची गणना

मुंबईत आशियाई जलपक्षांची गणना

Published on

मुंबईत आशियाई जलपक्षी गणना
पाणथळ जागी परदेशी पाहुण्यांची मांदियाळी

सकाळ वृत्तसेवा

​मुंबई, ता. २४ : मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) जैवविविधतेचे रक्षण आणि पाणथळ जागांवरील पक्ष्यांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मॅंग्रोव्ह सेलतर्फे शनिवारी (ता. २४) ‘आशियाई जलपक्षी गणना’ उपक्रम राबवण्यात आला. या सर्वेक्षणात १००हून अधिक निसर्गप्रेमी आणि वन कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवत ३० हून अधिक प्रजातींच्या जलपक्ष्यांची नोंद केली.

वेटलँड्स इंटरनॅशनल या संस्थेमार्फत जागतिक स्तरावर राबवल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय जलपक्षी गणना मोहिमेचा आशियाई जलपक्षी गणना हा एक भाग आहे. भारतात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) या उपक्रमासाठी नोडल संस्था म्हणून काम करते. दरवर्षी जानेवारीत होणारा हा उपक्रम ‘नागरिक विज्ञान’ मॉडेलवर आधारित आहे. मुंबईतील नैसर्गिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा चार पाणथळ क्षेत्रांमध्ये ही गणना करण्यात आली. यामध्ये भांडुप पम्पिंग स्टेशन, ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य, टी. एस. चाणक्य जलक्षेत्र, एनआरआय वेटलँड्स (नवी मुंबई) यांचा समावेश होता. ​‘बीएनएचएस’चे संशोधक आणि पक्षीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या गणनेत ३०पेक्षा अधिक प्रजाती आढळल्या. यामध्ये प्रामुख्याने नॉर्दर्न पिंटेल, युरेशियन स्पुनबिल, गॅडवॉल, स्टिंट, मार्श सॅंडपायपर, वूड सॅंडपायपर, ब्लॅक-टेल्ड गॉडविट, नॉर्दर्न शोव्हलर, व्हिस्कर्ड टर्न आणि ब्राऊन हेडेड गल यांसारख्या लांब पल्ल्यावरून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांचा समावेश होता.

परिसंस्थांच्या आरोग्याचा अंदाज
‘आशियाई जलपक्षी गणना हा केवळ पक्षी मोजण्याचा उपक्रम नसून, याद्वारे आपल्या पाणथळ परिसंस्थांच्या आरोग्याचा अंदाज येतो. या माध्यमातून संवर्धनाबाबत जनजागृती करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.’ असे मॅंग्रोव्ह सेलच्या उपवनसंरक्षक, मधुमिता एस. यांनी सांगितले. तर ‘नागरिक आणि वन विभाग यांनी एकत्र येऊन वन्यजीव निरीक्षणासाठी काम करणे ही काळाची गरज आहे. स्वयंसेवकांच्या मदतीने दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम राबवण्याचा मॅंग्रोव्ह सेलचा मानस आहे,’ असे मॅंग्रोव्ह सेलचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी सांगितले.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com