

उच्च न्यायालयाचा निर्णय महत्त्वाचा!
सरन्यायाधीश सूर्य कांत : सर्वोच्च न्यायालयापर्यंत पाेहाेचण्याची पायरी नाही
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : देशाचे सर्वोच्च न्यायालय म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम असला तरीही कोणत्याही उच्च न्यायालयाचा निर्णय अनेकदा सर्वाधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळे उच्च न्यायालये ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचण्याची पायरी नाही, असे मत देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी शनिवारी (ता. २४) नोंदवले.
बॉम्बे बार असोसिएशनकडून आयोजित कायदेतज्ज्ञ फली नरिमन स्मृती व्याख्यानांतर्गत ‘अनुच्छेद २२६’ या विषयावर सरन्यायाधीश बोलत होते. या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, सर्वोच्च न्यायालयाचे न्या. दीपांकर दत्ता, न्या. प्रसन्न वराळे, न्या. रवींद्र घुगे, न्या. गिरीश कुलकर्णी, महाधिवक्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
उच्च न्यायालयांनी पर्यावरणाचे संरक्षण, कैद्यांना मानवाधिक्कार सुनिश्चित करण्यासाठी आणि राष्ट्रीय संकटाच्या वेळी स्थलांतरित मजुरांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी महत्त्वाचे आदेश दिल्याकडेही न्या. सूर्य कांत यांनी लक्ष वेधले. आणीबाणीचा काळ लोकशाहीची कसोटी पाहणारा होता. या काळात नागरिक स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष नाहीच, तर ते हेतुपुरस्सर दडपल्याचे मतही सरन्यायाधीशांनी व्यक्त केले. याच आणीबाणीच्या काळात फली नरिमन यांचे योगदान, आठवणींनाही सरन्यायाधीश कांत यांनी उजाळा दिला.
सर्वप्रथम उच्च न्यायालयात दाद न मागता थेट सर्वोच्च न्यायालयाची पायरी चढणाऱ्यांविषयीही सरन्यायाधीशांही नाराजी व्यक्त केली. संविधानातील अनुच्छेद ३२नुसार परवानगी आहे. त्यानुसार काही विशेषाधिकारांनुसार थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका केली जाऊ शकते, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
-----
‘डिजिटल युगाशी जुळवून घ्या’
न्यायाचे भविष्य केवळ आपण वादांवर किती कार्यक्षमतेने निर्णय देतो यावर अवलंबून नाही. आपण ते किती कुशलतेने सोडवतो, यावरही अवलंबून आहे. मध्यस्थी, सलोखा आणि लवाद हे केवळ सोयीचे पर्याय नाहीत. ती परिपक्व न्यायाची साधने आहेत. त्यामुळे मध्यस्थींना प्रोत्साहन देणारे वातावरण न्यायालयांनी निर्माण करण्याचे आवाहन सरन्यायाधीशांनी मुंबई उच्च न्यायालयाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभाला मार्गदर्शन करताना केले. सर्वसामान्यांसाठी न्याय प्रक्रिया साेपी करण्यासाठी त्यांनी डिजिटल युगाशी जुळवून घेण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
त्यांचे निर्णय दिशादर्शक ठरतील!
हरियानातील सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती निष्ठा, बुद्धिमत्ता आणि परिश्रमाच्या बळावर देशाच्या सर्वोच्च न्यायिक पदापर्यंत पाेहाेचली आहे. समानतेच्या संधीचे हे प्रतीक असून कष्ट, संयम, कायद्याविषयी निष्ठेचा हा प्रवास आहे. सूर्य कांत यांच्या सरन्यायाधीश म्हणून कार्यकाळात संविधानिक, सामाजिक आणि प्रशासकीय आव्हाने उभी राहणार आहेत. त्यामुळे त्यांचे निर्णय हे भविष्यकाळातील दिशा देणारे ठरतील, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरन्यायाधीशांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.