किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या

किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या
किरकोळ वादातून प्रवाशाची हत्या
Published on

मारेकरऱ्याला २४ तासांत अटक
रेल्वे प्रवासी सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : लोकलमधून उतरताना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात होऊन एका प्राध्यापकाचा बळी जाण्याची धक्कादायक घटना मालाड रेल्वे स्थानकावर शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी घडली. आलोककुमार सिंग (वय ३२, रा. मालाड पूर्व) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली असली, तरी या घटनेने मुंबई लोकलमधील प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रवासी संघटनांनी यावर कारवाईची मागणी केली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीहून बोरिवलीकडे जाणाऱ्या बोरिवली लोकलमधून आलोककुमार सिंग प्रवास करत होते. सायंकाळी सुमारे ५.४० वाजता लोकल मालाड स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर थांबताच गाडीतून उतरण्याच्या कारणावरून त्यांचा आरोपीसोबत वाद झाला. क्षणार्धात हा वाद हाणामारीत बदलला. याचदरम्यान, आरोपीने जवळील धारदार शस्त्राने आलोककुमार सिंग यांच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केला. गर्दीच्या वेळेत, प्रवाशांच्या डोळ्यादेखत हा प्रकार घडूनही आरोपी सहजपणे पळून जाण्यात यशस्वी ठरला, ही बाब रेल्वे प्रशासन आणि पोलिसांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणारी आहे. गंभीर जखमी अवस्थेत आलोककुमार सिंग यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, गर्दीच्या वेळेत स्थानकांवर पुरेशी पोलिस गस्त नसणे, फलाटावरील सुरक्षाकवच कमकुवत असणे, तसेच लोकलमधील भांडण वेळीच आवरण्यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे. रोज लाखो प्रवासी मुंबई लोकलवर अवलंबून असताना, क्षुल्लक वाद थेट जीवघेण्या हल्ल्यात कसा बदलतो, हा गंभीर प्रश्न प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे.

अतिरिक्त सुरक्षेचा तोडगा
मालाड रेल्वे स्थानकावरील घटनेची आम्ही गंभीर दखल घेतली आहे. तसेच लोहमार्ग पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे. प्रवाशांची सुरक्षितता हे रेल्वे प्रशासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जीआरपी व आरपीएफ यांच्या समन्वयाने अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना तातडीने राबविल्या जातील, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’ला सांगितले.


मालाड घटनेने रेल्वे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात असल्याचे उघड झाले आहे. हा वादाचा मुद्दा नसून कायदा व सुव्यवस्थेचे अपयश आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य शासनाने जबाबदारी घ्यावी व जीआरपी, आरपीएफसह तातडीची बैठक घेऊन कठोर उपाय जाहीर करावेत.
- लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ

लोकल आणि रेल्वे स्थानकांवर वाढणाऱ्या हिंसक घटनांनी प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. गर्दीच्या प्रवासात क्षुल्लक वाद थेट प्राणघातक ठरत आहेत, हे प्रशासनाचे अपयश आहे. प्रवासी सुरक्षित नसतील, तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील विश्वासच डळमळीत होईल.
- नंदकुमार देशमुख, नेते, प्रवासी संघटना
......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com