आता बंद दरवाजांची साधी लोकल धावणार!
आता बंद दरवाजांची साधी लोकल धावणार!
मध्य रेल्वेवर एप्रिलपासून सेवेत?
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मुंब्रा येथील लोकल दुर्घटनेनंतर मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर विचार सुरू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी बंद दरवाजांच्या लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तयार होणारे दोन नवे विनावातानुकूलित लोकल रेक मध्य रेल्वेच्या ताफ्यात मार्च २०२६मध्ये दाखल होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या लोकलची महत्त्वाची वैशिष्ट्ये म्हणजे डबे आतून एकमेकांना जोडलेले असणार आहेत. वातानुकूलित लोकलप्रमाणे ‘वेस्टिब्यूल’ प्रणालीचा वापर प्रथमच विनावातानुकूलित लोकलमध्ये करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रेक दाखल झाल्यानंतर त्यांची तांत्रिक व सुरक्षिततेच्या दृष्टीने सखोल चाचणी केली जाईल. सर्व निकष पूर्ण झाल्यानंतर एप्रिल २०२६पासून ही लोकल प्रवासी सेवेत आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. या लोकलमधील वेस्टिब्यूल प्रणालीमुळे प्रवाशांना चालत्या ट्रेनमध्येच एका डब्यातून दुसऱ्या डब्यात सुरक्षितपणे जाता येईल. आतापर्यंत ही सुविधा केवळ वातानुकूलित लोकलपुरती मर्यादित होती. या बदलामुळे गर्दीचे व्यवस्थापन सुधारण्यास मदत होईल तसेच फलाटावर होणारी धावपळ कमी होण्याची शक्यता आहे.
...
अपघातांना आळा
नव्या लोकलमध्ये पूर्णतः बंद दरवाजांची व्यवस्था असेल. त्यामुळे धावत्या ट्रेनमधून पडण्याचे प्रकार, गर्दीत ढकलाढकली आणि अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. दररोज लाखो प्रवासी प्रवास करीत असलेल्या मुंबई लोकलसाठी हा बदल महत्त्वाचा मानला जात आहे.
...
आधीचा प्रयोग अपूर्ण
मुंब्रा दुर्घटनेनंतर ९ जून २०२५ला बंद दरवाजांच्या लोकलचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२५मध्ये कुर्ला आगारात एका विनावातानुकूलित लोकलमध्ये बदल करण्यात आला. ही लोकल सध्या हार्बर मार्गावर धावत असली तरी तांत्रिक अडचणींमुळे दरवाजे प्रत्यक्ष वापरात आलेले नाहीत.
...
आठ वर्षांत ४,२९० प्रवाशांचा मृत्यू
माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार, २०१७ ते २०२४ या कालावधीत मध्य व पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून पडून ७,७९८ प्रवासी जखमी झाले, तर ४,२९० प्रवाशांना जीव गमवावा लागला. या आकडेवारीमुळेच बंद दरवाजांच्या लोकलची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

