‘कूपर’मध्ये इम्युनोग्लोबिनचा तुटवडा
‘कूपर’मध्ये इम्युनोग्लोबिनचा तुटवडा
रुग्णांची वणवण; इतर रुग्णालयांत रवानगी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : कुत्रा, मांजर किंवा माकडाने गंभीर चावा घेतल्यास रेबीजपासून संरक्षणासाठी अँटी-रेबीज लस देण्यासह इम्युनोग्लोबिन इंजेक्शन देणे अत्यावश्यक असते; मात्र मुंबई महापालिकेच्या कूपर रुग्णालयात सध्या इम्युनोग्लोबिन इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे.
दरम्यान, इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना इतर केंद्रांमध्ये पाठवले जात आहे. या तुटवड्यामुळे आपत्कालीन उपचारासाठी आलेल्या रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची कबुली रुग्णालयातील सूत्रांनी दिली. कूपर रुग्णालयासह व्ही. एन. देसाई रुग्णालयातही इम्युनोग्लोबिन इंजेक्शन उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना मोठ्या केंद्रांकडे धाव घ्यावी लागत आहे. कुत्र्याच्या चाव्याचा प्रकार घडलेल्या सूरज सिंह यांनी सांगितले, की कूपर रुग्णालयात अँटी-रेबीज इंजेक्शन देण्यात आले; मात्र इम्युनोग्लोबिन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना विलेपार्ले येथून जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात पाठवण्यात आले. त्याचप्रमाणे मांजरीच्या चाव्यामुळे व्ही. एन. देसाई रुग्णालयात आलेल्या सफिया खान यांनाही अँटी-रेबीज लस देण्यात आली; मात्र इम्युनोग्लोबिन इंजेक्शन नसल्याने त्यांना दुसऱ्या मोठ्या रुग्णालयात रेफर करण्यात आले.
----
लस का महत्त्वाची?
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कुत्रा, मांजर किंवा माकडाने खोल चावा घेतला असेल, जखमेतून रक्तस्राव होत असेल किंवा जखम गंभीर स्वरूपाची असेल, तर तो ‘ग्रेड तीन’ चावा मानला जातो. अशा वेळी अँटी-रेबीज लसीसोबत इम्युनोग्लोबिन इंजेक्शन देणे गरजेचे असते. इम्युनोग्लोबिन हे तयार अँटीबॉडीज असून, ते जखमेच्या आजूबाजूला असलेला विषाणू तातडीने निष्क्रिय करते, तर रेबीज लस शरीरात अँटीबॉडी तयार होण्यासाठी सात ते चौदा दिवसांचा कालावधी घेते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

