संजय गांधी राष्ट्रीय उद्यान्यात तोडकामावरून रणकंदन
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात तोडकामावरून रणकंदन
पोलिस - स्थानिकांत झटापट
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २७ : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील (नॅशनल पार्क) वन जमिनीवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी गेलेल्या वन विभाग आणि पोलिस पथकाला आज आदिवासींच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. तोडकामाच्या कारवाईला विरोध करण्यासाठी स्थानिक नागरिक आणि आदिवासी कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकवटल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. या वेळी पोलिस आणि स्थानिकांत जोरदार झटापट झाली. काही आंदोलकांची प्रकृती बिघडली, तर संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली.
वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या फौजफाट्यासह तोडकामासाठी दाखल झाले होते. या वेळी ‘आमची घरे तोडू देणार नाही,’ असा पवित्रा घेत आदिवासींनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. बॅनर आणि फलक हातात घेऊन महिला व तरुणांनी प्रशासनाचा रस्ता अडवून धरला. या वेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये मोठी धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. आक्रमक झालेल्या तरुणांना पांगवताना पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. प्रशासनाची कारवाई आणि निर्माण झालेला गोंधळ पाहून काही स्थानिक नागरिकांची प्रकृती अचानक बिघडली. यामध्ये काहींना चक्कर येणे व अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपल्या हक्काच्या निवाऱ्यावर हातोडा पडत असल्याचे पाहून अनेक महिलांना रडू कोसळले होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून परिसरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काही तरुणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने वातावरण अधिकच चिघळले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नव्हती; मात्र शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
...
तणावपूर्ण शांतता
आम्ही वर्षानुवर्षे येथे राहत आहोत. आमचे पुनर्वसन करण्याऐवजी थेट घरे तोडणे अन्यायकारक आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. प्रशासनाने मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. या वादामुळे बोरिवली परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
...
घरे पाडण्यास स्थगिती
- बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी बांधवांची घरे तोडण्याची कारवाई स्थगित करण्याचे आदेश राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज दिले. यासंदर्भात शिवसेनेचे मागाठाणेचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी काल या तोडक कारवाईसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधून तोडक कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली होती. उपमुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणी केली. मुख्यमंत्र्यांनी या तोडक कारवाईला स्थगिती देण्याच्या सूचना वनमंत्री गणेश नाईक यांना दिल्या. त्यानुसार आज दुपारी मंत्रालयात वनमंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत त्यांनी कारवाईला स्थगिती आदेश दिल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात त्रिमूर्ती मंदिराजवळ पर्यटनासाठी राखीव भूखंड आहे. तिकडे अनेक वर्षे वास्तव्यास असलेल्या आदिवासी बांधवांना तो मजला अधिक एक मजला अशी घरे बांधून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे. त्यामुळे त्यांचे वास्तव्य आणि उदरनिर्वाह येथे शाबूत राहील, अशी आग्रही भूमिका आपण या बैठकीत मांडल्याची माहिती आमदार सुर्वे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

