जबाबदारीची जाणीव अन् सर्वोत्तम कामगिरीसाठी नवचेतना

जबाबदारीची जाणीव अन् सर्वोत्तम कामगिरीसाठी नवचेतना

Published on

जबाबदारीची जाणीव अन् सर्वोत्तम कामगिरीसाठी नवचेतना
राष्ट्रपती पदक जाहीर झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ ः राष्ट्रपती पदक कर्तव्यनिष्ठेची पोचपावती असते. या सर्वोच्च पदकासाठी निवड झाल्याचा आनंद, समाधान असतेच. त्यासोबत जबाबदारी वाढल्याची जाणीवही झाली. हे पदक म्हणजे वरिष्ठांसह जनतेचा विश्वास अबाधित ठेवून पोलिस दलाचा नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम कामगिरी घडावी, यासाठीची नवचेतना आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती पदकासाठी निवड झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदवली.

महेश पाटील,
अतिरिक्त पोलिस आयुक्त
पोलिस दलात अतिरिक्त पोलिस आयुक्त महेश पाटील यांची प्रामाणिक, कर्तव्यकठोर अशी ओळख आहे. त्यासोबत प्रयोगशील अधिकारी म्हणूनही ते ज्ञात आहेत. हाताखालील अधिकारी, अंमलदारांची कार्यतत्परता वाढवण्यासोबत कायदा-सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी त्यांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देत विविध प्रयोग केले. मुंबईत उपआयुक्त असताना अंडरवर्ल्ड डॉन अश्विन नाईक याच्या अटकेसाठी त्यांनी आखलेल्या व्यूहरचनेचे विशेष कौतुक झाले. मुंबईसह ठाणे आणि राज्य दहशतवादविरोधी पथकात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बाळकृष्ण यादव,
उपआयुक्त, वायरलेस
उपआयुक्त बाळकृष्ण यादव यांनी तब्बल ३६ वर्षे पोलिस दलाचा कणा असलेल्या बिनतारी संदेशवहन विभागात (वायरलेस) कार्यरत राहून सर्व प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत घटनास्थळ आणि नियंत्रण कक्षाचा संवाद अखंड सुरू राहावा, यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे दूरसंचार सेवा ठप्प असतानाही पोलिसांची यंत्रणा यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे अखंड सुरू राहिली. अद्ययावत टॅक्टिकल कम्युनिकेशन ८०० मेगाहर्टस् कन्व्हेन्शनल प्रणाली क्यूआरटी आणि फोर्स कमांडो पथकांसाठी कार्यान्वित करण्यात, २६/११ हल्ल्यानंतर शहरात सर्वत्र उभारलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा निगराणीसाठी प्रभावी वापर करण्यात, नागरिकांसाठी १०० आणि ११२ हेल्पलाइन अधिक प्रभावी करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. किल्लारी भूकंपानंतर बचावकार्यासाठी अत्यंत आवश्यक असलेली संदेशवहन यंत्रणा अबाधित ठेवण्यात यादव यांचे सहकार्य होते.

पुरुषोत्तम नारायण कराड,
पोलिस उपायुक्त, सायबर, मुंबई
गोंदिया, गडचिरोली, सोलापूर, नवी मुंबई, मुंबई येथे उल्लेखनीय सेवा बजावल्यानंतर उपआयुक्त कराड यांच्यावर गृह विभागाने शहरातील सायबर विभागाची जबाबदारी सोपवली. टोकावर पोहोचलेले सायबर गुन्हे रोखण्यासाठी त्यांनी धडक कारवाईसह आक्रमक जनजागृतीवर भर दिला आहे. याआधी त्यांना केंद्र शासनाचे अंतर्गत सुरक्षा पदक, महाराष्ट्र शासनाचे खडतर सेवा पदक, फोर्स वन सेवा पदक, पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

सायरस बोमन इराणी,
सहाय्यक आयुक्त, वाहतूक
धार्मिक तणावाची परिस्थिती कुशलतेने हाताळण्याचे कसब असलेले सहाय्यक आयुक्त इराणी यांना वैशिष्ट्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येईल. १९९२-९३च्या जातीय दंगलीनंतर त्यांनी जेजे मार्ग या अत्यंत संवेदनशील पोलिस ठाण्यातून आपली कारकीर्द सुरू केली. प्रत्येक धार्मिक सण-उत्सवाच्या काळात त्यांनी कौशल्याने कायदा-सुव्यवस्था आणि जातीय सलोखा राखला. विशेष म्हणजे त्यांनी तयार केलेली आंतरराष्ट्रीय क्रूझ इमिग्रेशनसाठीची मानके पुढे ब्युरो ऑफ इमिग्रेशनने राष्ट्रीय स्तरावर स्वीकारली. वाहतूक विभागातील कारकिर्दीत त्यांनी विश्वविजेत्या भारतीय संघाची मिरवणूक, मराठा आंदोलन असे अनेक प्रसंग अचूक व्यूहरचना आखून विनाअडथळा मार्गी लावले.

महेश तावडे,
सहाय्यक आयुक्त, वाहतूक
देशात महाराष्ट्रासह अन्य राज्यांत साखळी बॉम्बस्फोट घडवणाऱ्या इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या संशयित अतिरेक्यांना पुणे, बंगळूर येथून अटक करणाऱ्या तावडे यांची वैशिष्ट्यपूर्ण सेवा श्रेणीतील राष्ट्रपती पदकासाठी निवड झाली. ३१ वर्षांच्या सेवाकाळात त्यांनी विविध पोलिस ठाणी, गुन्हे शाखेत कर्तव्य बजावले. या काळात त्यांनी संघटित गुन्हेगारी टोळ्यांच्या १० साथीदारांचे एन्काउंटर केले. यासोबत नीरज ग्रोव्हर, पल्लवी पूर कायस्थ, सरला पटेल आदी बहुचर्चित, क्लिष्ट हत्याकांड, गुन्ह्यांचा यशस्वी तपास केला आहे.

डॉ. मोहन दहीकर,
पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक डॉ. दहीकर यांची गुणवत्तापूर्वक सेवा श्रेणीत राष्ट्रपती पदकासाठी निवड करण्यात आली आहे. दहीकर मूळचे अमरावतीचे. २००२मध्ये पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी दहीकर यांनी बीएएमएस आणि एमबीए पदवी घेतली. काही काळ ईएसआयएसमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले होते. नागपूर, चंद्रपूर येथे उपअधीक्षक, मुंबईत वाहतूक विभाग, गुन्हे शाखा आणि एसटीएसमध्ये उपआयुक्त म्हणून जबाबदारी हाताळली. त्यांनी भिवंडी या संवेदनशील शहरात अचूक व्यूहरचना, जनसंपर्क वाढवून जातीय सलोखा राखला. येथील धार्मिक सणांसोबत निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com