बेलासिस उड्डाणपुलासाठी मुहुर्त कधी?

बेलासिस उड्डाणपुलासाठी मुहुर्त कधी?

Published on

बेलासिस उड्डाणपुलासाठी मुहूर्त कधी?
काम पूर्ण होऊनही उद्‌घाटन रखडले; कोंडीचा विळखा कायम
​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणाऱ्या बेलासिस उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले तरी हा पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. पुलाचे काम १०० टक्के पूर्ण होऊनही केवळ उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेमुळे हा मार्ग बंद असल्याने मुंबईकरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
​मुंबई महापालिकेने या पुलाच्या दुरुस्तीचे आणि विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले आहे. पुलावरील डांबरीकरण, रेलिंग आणि विद्युत रोषणाईची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, अद्याप वरिष्ठ नेत्यांची वेळ न मिळाल्याने या पुलाची फित कापली गेलेली नाही, असा आरोप होत आहे.
​बेलासिस पूल बंद असल्याने याचा थेट फटका मुंबई सेंट्रल, ताडदेव आणि भायखळा परिसरातील वाहतुकीला बसत आहे. पुलाचा वापर बंद असल्याने वाहनांना लांबच्या अंतराने वळसा घालून जावे लागत आहे, ज्यामुळे प्रवासाच्या वेळेत ३० ते ४० मिनिटांची वाढ होत आहे. जवळच असलेल्या नायर आणि जे. जे. रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही या कोंडीचा सामना करावा लागत आहे.
पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि तांत्रिक तपासणी पूर्ण झाली आहे. प्रशासकीय स्तरावर उद्‌घाटनाची तयारी सुरू असून, लवकरच हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल, असे रस्ते विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

...अन्यथा आम्‍हीच उद्‌घाटन करू
काम पूर्ण झाले असेल, तर पूल तातडीने सुरू करा, उद्‌घाटनाचा सोहळा नंतरही करता येईल, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून केली जात आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर पूल लवकर सुरू न झाल्यास स्वयंस्फूर्तीने उद्‌घाटन करण्याचा इशाराही दिला आहे.

पुलाचे काम पूर्ण होऊनही केवळ नेत्यांना फिती कापण्यासाठी तो बंद ठेवणे म्हणजे मुंबईकरांची क्रूर चेष्टा आहे. वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या रुग्णवाहिका आणि सामान्यांच्या वेळेची प्रशासनाला किंमत नाही का? आठवडाभरात हा पूल सुरू न झाल्‍यास आम्ही उद्‌घाटनाची वाट न पाहता स्वतः पुलावरून वाहतूक सुरू करू. प्रशासनाने आता तरी राजकारण थांबवून लोकांच्या त्रासाचा विचार करावा.
- संतोष दौंडकर, सामाजिक कार्यकर्ते

रेल्‍वेच्या प्रमाणपत्राची गरज
पूल विभागाचे मुख्य अभियंता उत्तम श्रोते प्रतिक्रिया देताना म्‍हणाले, बेलासिस पुलाचे काम पूर्ण झालेले आहे. पूल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र लागणार असून, ते मिळवण्याचे काम सुरू आहे. प्रमाणपत्र मिळतात पूल सुरू केला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com