प्रदूषणावर महापालिकेचा 
शेकडाे नोटिसांचा ‘फार्स’

प्रदूषणावर महापालिकेचा शेकडाे नोटिसांचा ‘फार्स’

Published on

प्रदूषणावर महापालिकेचा
शेकडाे नोटिसांचा ‘फार्स’

१० दिवसांत बांधकामे रोखली; पण कारवाई कागदावरच?

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : शहरातील हवेची गुणवत्ता ढासळत असताना मुंबई महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी सुरू केलेली मोहीम केवळ प्रशासकीय सोपस्कार ठरत आहे. १६ ते २७ जानेवारी या १० दिवसांच्या कालावधीत पालिकेने शेकडो नोटिसा पाठवल्या असल्या तरी प्रत्यक्षात दंड किंवा कठोर कायदेशीर कारवाईऐवजी केवळ ‘कारणे दाखवा’ आणि ‘काम थांबवा’ इथपर्यंतच खेळ सुरू असल्याची पर्यावरणप्रेमी टीका करत आहेत.

​पालिकेच्या पर्यावरण विभागाने प्रसिद्ध केलेल्या ‘ॲक्शन टेकन रिपोर्ट’नुसार (एटीआर) १० दिवसांत १,१६४ ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. यात १५९ ‘कारणे दाखवा’ तर १८७ ‘काम थांबवा’ अशा नोटिसा बजावण्यात आल्या. या नोटिसा दिल्यानंतर काही दिवसांतच अनेक ठिकाणच्या नोटिसा रद्द करण्याचा धडाका पालिकेने लावला आहे. यामुळे ही कारवाई केवळ बिल्डरांना जरब बसवण्यासाठी आहे की पळवाट काढून देण्यासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

​खासगी बिल्डरांवर नोटिशींचा भडिमार करणाऱ्या पालिकेने स्वतःच्या आणि मेट्रो, रस्ते काम यांसारख्या सरकारी प्राधिकरणांच्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केल्याचे आकडेवारीवरून दिसते. २१ जानेवारीला ९५ खासगी प्रकल्पांवर कारवाईचा बडगा उगारला; मात्र त्याच वेळी सुरू असलेल्या सरकारी कामांतील त्रुटींकडे डोळेझाक करण्यात आल्याचे समजते. ​मुंबईकरांचा श्वास गुदमरत असताना केवळ नोटिसा देऊन प्रशासन आपली जबाबदारी झटकत आहे. जोपर्यंत दोषींवर मोठा आर्थिक दंड किंवा परवाना रद्द करण्यासारखी ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत मुंबईच्या प्रदूषणाचा प्रश्न सुटणे कठीण आहे.
........
स्वच्छतेच्या पैशांचा धुरळा
​प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने ७२७ किलाेमीटरचे रस्ते टँकरने धुण्याचा दावा केला आहे. यासाठी ३००हून अधिक वॉटर टँकरच्या शिफ्ट लावण्यात आल्या. हवेतील धूळ खाली बसवण्यासाठी १२० शिफ्टमध्ये मिस्टिंग मशिन्स फिरवण्यात आल्या. तरीही मुंबईच्या अनेक भागांत अजून धुळीचे साम्राज्य कायम आहे. या ‘डीप क्लीनिंग’ मोहिमेच्या नावाखाली केवळ पाण्याचा अपव्यय आणि कंत्राटदारांचे खिसे भरले जात असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करत आहेत.
-----

स्थळभेट अन्‌ कारवाई (​१६-२७ जानेवारी २०२६)
भेट दिलेली बांधकामे/ठिकाणे : १,१६४
कारणे दाखवा नोटिसा : १५९
काम थांबवण्याच्या नोटिसा : १८७
रस्ते स्वच्छता (टँकरद्वारे) : ७२७.०५ किमी
मिस्टिंग मशीनचा वापर : ६३४.६५ किमी
.........
प्रदूषण नियंत्रणासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याबरोबरच प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जोरदार कारवाईही सुरू आहे. या सर्व कारवाईची माहिती आम्ही वेळोवेळी न्यायालयाला दिलेली आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी पालिका आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. यात कारवाईचादेखील समावेश आहे.
- अविनाश काटे, उपायुक्त, पर्यावरण विभाग
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com