वाहतूक पोलिसांचा धाक प्रस्थापित

वाहतूक पोलिसांचा धाक प्रस्थापित

Published on

मद्यपी वाहनचालकांना धाक
दारूच्या नशेत वाहन चालवण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी घटले

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर आरंभलेल्या कठोर कारवाईचा परिणाम २०२५ मध्ये स्पष्ट जाणवला. २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये दारूच्या नशेत वाहन चालवण्याचे प्रकार तब्बल ४० टक्क्यांनी घटले. यावर्षी हे प्रमाण आणखी कमी करण्याचा वाहतूक पोलिसांचा मानस आहे.
२०२४ मध्ये वाहतूक पोलिसांच्या हाती मद्याच्या अमलाखाली वाहने चालवणारे ९,४६२ चालक लागले होते. २०१९ नंतर २०२४ मध्ये दारूच्या नशेत वाहन चालवून नियमभंग करणाऱ्यांची सर्वाधिक नोंद झाली. या बेछूट वर्तनाची गंभीर दखल घेत वाहतूक विभागाचे सहआयुक्त अनिल कुंभारे यांच्या सूचनेवरून विविध पातळ्यांवर कठोर कारवाया सुरू करण्यात आल्या. त्याचे परिणाम २०२५ मध्ये विशेषतः वर्षाच्या उत्तरार्धात दिसून आले. २०२५ मध्ये हे प्रमाण ५,७९८ इतके खाली घसरले. २०२४ या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी झाले.
दारूच्या नशेत कोणी वाहन हाती घेण्याची हिंमत करू नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी एप्रिल २०२५ पासून मद्यपी चालक सापडला रे सापडला की त्याच्याविरोधात भारतीय दंड संहितेतील कलम १२५ नुसार गुन्हा नोंदवण्यास सुरुवात केली. एप्रिल ते डिसेंबर महिन्यात ३,७११ गुन्हे नोंदवण्यात आले. या कारवाईचा सर्वाधिक धाक चालकांना बसला.
गुन्हा नोंदवण्यासोबत वाहतूक पोलिसांनी हाती लागलेल्या मद्यपी चालकांचे लायसन्स तात्पुरते, कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत आरटीओकडे प्रस्ताव पाठवण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी एकूण २,४३८ प्रस्ताव पाठवले. त्यातील २,०२५ जणांचे लायसन्स रद्द केले.
नाकाबंदीत हाती लागलेल्या मद्यपी चालकांची नावे आणि अन्य तपशील वाहतूक पोलिसांनी नियमितपणे आपल्या समाजमाध्यम खात्यांवरून जाहीर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे दारूच्या नशेत वाहन चालवताना सापडला, गुन्हा नोंद झाला, लायसन्स रद्द झाल्याची माहिती सर्वदूर पसरू लागल्याने अन्य चालकांवर दहशत निर्माण झाली.

नाकाबंदीची व्यूहरचना

वाहतूक पोलिसांनी शहरातील नव्या जागा शोधून तेथे अचानक नाकाबंदी सुरू केली. त्यामुळे ठराविक दिवशी किंवा ठराविक ठिकाणी कारवाईची होते हे गृहीत धरून अन्य मार्गाने निसटू पाहणारे मद्यपी चालकही कारवाईच्या कचाट्यात सापडू लागले.


दारूच्या नशेत वाहन चालवल्यास अपघाताची शक्यता जास्त असते. तो नियमभंग आहेच पण त्याहून अधिक स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाशी खेळ आहे. जनजागृतीनंतरही याची जाणीव होणार नसेल, तर कठोर कारवाईशिवाय दुसरा पर्याय नाही. यावर्षी हे प्रमाण आणखी खाली आणण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जातील.
- अनिल कुंभारे, सहआयुक्त, वाहतूक

फोटो - 048

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com