‘एआय’च्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करणार

‘एआय’च्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करणार

Published on

‘एआय’च्या माध्यमातून दिव्यांगांना आत्मनिर्भर करणार
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे प्रतिपादन
मुंबई, ता. ३० : ‘दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही केवळ आधुनिक तांत्रिक संकल्पना न राहता त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करणारे प्रभावी साधन ठरत आहे. दृष्टिदोष, श्रवणदोष, शारीरिक तसेच बौद्धिक अक्षम असलेल्या व्यक्तींसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपकरणे, अ‍ॅप्स आणि डिजिटल सेवा मोठ्या प्रमाणावर उपयुक्त ठरत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना सुलभ सेवा निर्माण करून त्यांना आत्मनिर्भर करावे,’ असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शुक्रवारी (ता. ३०) केले.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिटच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्यांग व्यक्तींच्या समावेशन व सक्षमीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) क्षमता उलगडणे’ या विषयावर प्री-समिट राउंडटेबलचे आयोजन मुंबईतील हॉटेल इंटर कॉन्टिनेंटल येथे करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्य सचिव अग्रवाल म्हणाले, ‘एआयच्या सहाय्याने तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक व्हीलचेअर, कृत्रिम हात-पाय, संवाद सहाय्यक उपकरणे, आय-ट्रॅकिंग व हेड-माऊससारखी साधने दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी जीवन जगण्यास मदत करीत आहेत. बौद्धिक अक्षमत्वाच्या क्षेत्रात, विशेषतः ऑटिझमचे निदान करण्यासाठी एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. शासकीय सेवांमध्ये एआयचा वापर करून दिव्यांगांसाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात येत आहे. बहुभाषिक चॅटबॉट आणि डिजिटल सहाय्य प्रणालींमुळे आवश्यक माहिती, थेरपी केंद्रे, विशेष शाळा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना एका क्लिकवर मिळत आहे. आता दिव्यांग केवळ स्वावलंबी होत नसून, कुटुंबाचे पालनपोषण करण्यास सक्षम होत आहेत. गुगल, एआय, मेटा यांच्यासह जवळपास शंभरएक स्टार्ट्अप्स दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहेत.’ एआयच्या मदतीने दिव्यागांचे जीवन सुकर होत असल्याचे सांगत मुख्य सचिव अग्रवाल यांनी विविध उदाहरणांवरून दिव्यांगांचा प्रेरणादायी प्रवास कथन केला.

राज्यातील दिव्यांगांची संख्या, त्यांचे अपंगत्वाचे प्रकार व गरजा यांची अचूक माहिती संकलित करून त्यावर आधारित धोरणे राबवली जात आहेत. दिव्यांग व्यक्तींना समाज व अर्थव्यवस्थेसाठी योगदान देणारे सक्षम घटक बनवणे, हेच शासनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि मशीन लर्निंगच्या सहाय्याने दिव्यांग सक्षमीकरणाला नवी दिशा मिळू शकते. शासनाच्या संकेतस्थळ व पोर्टल्स दिव्यांगांसाठी सुलभ करण्यावर भर देण्यात येत आहे. नजीकच्या काळात एक सर्वसमावेशक सुलभ डिजिटल पोर्टल विकसित करण्यात येणार आहे. या पोर्टलवर एकदाच नोंदणी केल्यानंतर पात्र असलेल्या सर्व योजना, त्यासाठी लागणारी कागदपत्रे इत्यादी माहिती दिव्यांग व्यक्तीस उपलब्ध होईल.
- तुकाराम मुंढे, दिव्यांग कल्याण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com