मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेचा आराखडा

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेचा आराखडा

Published on

मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेचा आराखडा
६०० कोटी रुपयांची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. १ : दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारी मुंबईकरांची कोंडी आणि टीका लक्षात घेऊन महापालिकेने यंदा आधीच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी मुंबईतील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी पालिकेने वॉर्ड स्तरावर डांबरीकरण आणि मास्टिक अस्फाल्ट कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.
मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये हे काम केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्या रस्त्यांचे अद्याप सिमेंट काँक्रीटीकरण झालेले नाही, अशा डांबरी रस्त्यांच्या पृष्ठभागाची दुरुस्ती केली जाईल. पावसामुळे रस्त्यांचे वरचे थर निघून खड्डे पडू नयेत, यासाठी मास्टिक अस्फाल्ट या अधिक टिकाऊ तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर पालिकेचा भर आहे.
​निविदेत महत्त्वाच्या कामांचा समावेश करण्यात आला असून, त्यात रस्त्यांवरील खड्डे भरणे, खराब झालेले पॅचेस दुरुस्त करणे आणि रस्त्यांचे सपाटीकरण करणे याचा समावेश आहे. यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापरही केला जाणार आहे. पावसाच्या पाण्याचा निचरा व्हावा आणि रस्ता खराब होऊ नये, यासाठी प्रगत कोल्ड मिक्स आणि मास्टिकचा वापर प्रस्तावित आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच मे महिन्यापर्यंत सर्व प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिकेने ठेवले आहे.
रस्ते कामांसाठी अनेक ठिकाणी वाहतूक वळवावी लागण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाळ्यात होणारा त्रास वाचवण्यासाठी ही कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, वॉर्ड स्तरावरील सहाय्यक आयुक्तांवर या कामाच्या दर्जाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ​पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या या कामांमुळे जून-जुलै महिन्यात मुंबईकरांना खड्डेमुक्त रस्त्यांचा प्रवास अनुभवता येईल, अशी अपेक्षा पालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे.

प्रगत तंत्रज्ञानाचा वापर
महापालिकेने यंदा पावसाळ्यापूर्वीच्या रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरण्याच्या कामांसाठी सुमारे ४०० ते ६०० कोटी रुपयांच्या निधीची भरीव तरतूद केली आहे. मुंबईतील २४ प्रशासकीय विभागांच्या (वॉर्ड) गरजेनुसार या निधीचे वाटप करण्यात आले असून, मोठ्या वॉर्डांसाठी १५ ते २५ कोटी रुपयांपर्यंतच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या खर्चाचा मोठा हिस्सा मास्टिक अस्फाल्टसारख्या प्रगत आणि टिकाऊ तंत्रज्ञानावर खर्च केला जाणार आहे, जेणेकरून पावसाळ्यात रस्त्यांची झीज कमी होईल.

दुरुस्‍तीसाठी स्‍वतंत्र निधी
केवळ खड्डे भरणेच नव्हे, तर पावसाळ्यादरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन दुरुस्तीसाठीही स्वतंत्र निधी राखून ठेवण्यात आला आहे. वॉर्ड स्तरावर सहाय्यक आयुक्तांच्या देखरेखीखाली हा खर्च केला जाणार असून, कामाच्या दर्जाशी तडजोड झाल्यास कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाईची तरतूदही करण्यात आली आहे. मे २०२६ पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com