दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या बंगल्यावर गोळीबार
बिश्नोई टोळीचा हात? जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट व्हायरल
पुण्यातून पाच संशयित ताब्यात
मुंबई, ता. १ : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानी शनिवारी (ता. ३१) मध्यरात्री झालेल्या गोळीबारप्रकरणी पाच संशयितांना पुण्यातून ताब्यात घेतल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. या हल्ल्यात कोणीही जखमी झालेले नाही.
दरम्यान, गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख फरार आरोपी शुभम लोणकर याच्या नावे असलेल्या फेसबुक खात्यावरून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यात आली. ही पोस्ट रविवारी करण्यात आली. मुंबई पोलिसांनीही ही पोस्ट गांभीर्याने घेत शेट्टी यांच्या निवासस्थानी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून गुन्हे शाखेने तपास हाती घेतला आहे. दरम्यान, शेट्टी यांनी याआधी संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून धमकावण्यात आल्याची तक्रार दिलेली नाही, असे सांगण्यात आले.
शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडल्या. त्यातील एक बंगल्याच्या गॅलरीतील काच फोडून आत शिरल्याचे समजते. मध्यरात्री घडलेल्या या गोळीबाराच्या वृत्ताला पोलिस आयुक्त देवेन भारती यांनी दुजोरा देताना स्थानिक पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी तपास सुरू केल्याची माहिती दिली. पोलिस पथकांनी लगोलग शेट्टी यांचे निवासस्थान आणि आसपासच्या वस्तीतील सीसीटीव्ही चित्रण तपासावर घेतले. त्यात संशयास्पद वाहन आढळले. माग काढला असता ते पुण्याच्या दिशेने गेल्याचे आढळले. या वाहनाची माहिती देत मुंबई पोलिसांनी पुणे पोलिसांना सतर्क केले. पुणे पोलिसांनी या माहितीच्या आधारे पाच तरुणांना ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या हवाली केले. यामध्ये अमन मारोते, आदित्य गायकी, सिद्धार्थ येनपुरे, समर्थ पोमाजी आणि स्वप्नील सकट अशी संशयितांची नावे आहेत. हे सर्व पुण्याचे रहिवासी आहेत. या संशयितांना रविवारी संध्याकाळी मुंबईत आणण्यात आले. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार या संशयितांकडे चौकशी केली जाईल. त्यानंतर अटकेबाबत निर्णय घेतला जाईल.
...अन्यथा पुढली गोळी छातीत
आम्ही अनेकदा रोहित शेट्टी यांना संदेश धाडून आमच्या कामामध्ये येऊ नका, असे बजावले होते; मात्र ते ऐकण्याच्या मनःस्थितीत नाहीत. हा गोळीबार फक्त ट्रेलर होता. पुढल्या गोळ्या त्यांच्या छातीत असतील. त्यांनी त्यांचे वर्तन सुधारावे अन्यथा बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट अवस्था होईल. आमचे म्हणणे न ऐकल्यास लपण्यास जागा मिळणार नाही, अशी धमकी लोणकर याच्या फेसबुक खात्यावरून देण्यात आली. हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोस्टखाली लोणकरसह आरजो बिश्नोई, हरी बॉक्सर, हर्मन शांडू अशी नावे आहेत.
मिळतीजुळती कृती
लोणकरच्या नावे फिरणारी फेसबुक पोस्ट खरी असावी, असा अंदाज पोलिसांना आहे. याआधी अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी गोळीबार केल्यावर अशाच प्रकारे पोस्ट व्हायरल करीत बिश्नोई टोळीने जबाबदारी स्वीकारली होती. पोस्ट अपलोड करून पुढल्या काही मिनिटांत डिलीट करायची, या पोस्टचा स्क्रीनशॉट किंवा छायाचित्र व्हायरल करायचे, ही बिश्नोई टोळीची कार्यपद्धती आहे. शेट्टी यांच्या प्रकरणातही अशाच प्रकारे पोस्ट व्हायरल करण्यात आल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. असे केल्याने पोस्ट करणाऱ्याच्या ठावठिकाण्याचे तांत्रिक तपशील पोलिसांना मिळत नाहीत, अशी त्यामागील कल्पना असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

