रुग्णांच्या उपचारांचा खर्च होणार कमी
रुग्णांच्या उपचारांचा खर्च होणार कमी
दुर्मिळ आजारांची औषधे स्वस्तचा परिणाम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात दुर्मिळ आणि आनुवंशिक आजारांनी त्रस्त रुग्णांसाठी मोठा दिलासा देण्यात आला आहे. या आजारांवर लागणाऱ्या काही महागड्या जीवनरक्षक औषधांवरील कस्टम ड्युटी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या औषधांच्या किमती कमी होण्याची शक्यता असून, उपचारांचा खर्च कमी होणार आहे.
केईएम रुग्णालयासह देशातील विविध सरकारी रुग्णालयांमध्ये दुर्मिळ आजारांचे अनेक रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत या औषधांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लागत असल्याने रुग्णांना लाखो रुपये खर्च करावे लागत होते. आता शुल्क माफ झाल्याने औषधांच्या किमती कमी होतील आणि रुग्णांवरील आर्थिक ताण कमी होईल, असे डॉक्टरांनी सांगितले.
केंद्र सरकारने ‘नॅशनल पॉलिसी फॉर रेअर डिसीज’अंतर्गत देशातील १२ सरकारी रुग्णालयांमध्ये दुर्मिळ आजारांसाठी विशेष उपचार केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांमध्ये निदान आणि उपचाराची सुविधा दिली जाते; मात्र औषधे महाग असल्याने अनेक वेळा उपचार सुरू ठेवणे रुग्णांना अवघड जात होते. नव्या अर्थसंकल्पातील निर्णयामुळे ही अडचण काही प्रमाणात दूर होणार आहे.
केईएम रुग्णालयातील सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रेअर डिसीजच्या डॉ. ममता मुरंजन यांनी सांगितले, की रेअर आजारांवरील उपचार अत्यंत महाग आहेत आणि त्याचा परिणाम सर्व स्तरांतील रुग्णांवर होतो.
काही दुर्मिळ आजारांमध्ये एका महिन्याच्या औषधांचा खर्च एक लाख रुपयांपर्यंत जातो. औषधांच्या किमती कमी झाल्यास तीच औषधे अधिक काळ वापरता येतील. त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना मोठा फायदा होईल.
अर्थसंकल्पात क्लिनिकल ट्रायल्सना चालना देण्याची घोषणाही तितकीच महत्त्वाची आहे. डॉ. ममता यांच्या मते, केईएम रुग्णालयात आधीपासूनच रेअर आजारांवरील क्लिनिकल ट्रायल्स सुरू आहेत आणि पात्र रुग्णांना ट्रायलदरम्यानच नव्हे तर त्यानंतरही औषधांचा लाभ दिला जातो.
निर्णय का महत्त्वाचा?
* देशभरात दुर्मिळ आजारांचे प्रमाण वाढत आहे.
* १२ केंद्रांमध्ये एकूण ४,५५९ रुग्ण उपचारासाठी नोंदणीकृत आहेत.
* डॉक्टरांच्या मते, औषधे इतकी महाग आहेत की बहुतेक रुग्णांच्या आवाक्याबाहेर आहेत.
मधुमेहावरील औषधांचा भार होईल कमी
सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी सांगितले, की मधुमेहाच्या औषधांचा खर्च प्रत्येक रुग्णासाठी दर महिना २० हजार येतो. पण महत्त्वाच्या दोन औषधांवरील आयात शुल्क कमी केल्यास याचा खूप जास्त दिलासा रुग्णांना मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

