

वरळी कोळीवाड्याच्या सीमांकनाला सुरुवात
५३ वर्षांच्या लढ्याला यश; ‘गावठाण’ म्हणून नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ ः वरळी कोळीवाड्यातील मूळ रहिवासी, कोळी, ईस्ट इंडियन आणि भंडारी समाजासाठी सोमवार (ता. २) आनंदाचा दिवस ठरला. १९७३ पासून स्थानिकांच्या जमिनीच्या हक्कासाठी सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला यश आले असून, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वरळी कोळीवाडा गावाच्या अंतर्गत सीमांकनाच्या कामाला सोमवारी सुरुवात झाली. कोळीवाड्याच्या सीमा निश्चित झाल्यामुळे बाहेरील अतिक्रमणांपासून जमिनीचे संरक्षण होईल. तसेच कोळीवाडा आता नकाशावर अधिकृत ‘गावठाण’ म्हणून नोंदवला गेल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
वरळी कोळीवाड्याची ग्रामदेवता श्री गोलफादेवी मातेला सोमवारी सकाळी नारळ वाढवून या ऐतिहासिक कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. मुंबई नगर भूमापन व भूमी अभिलेख अधीक्षक धनाजीराव धायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, परिरक्षण भूमापक संदीप चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मोजणी सुरू करण्यात आली. उच्च न्यायालयाने मुंबई जिल्हाधिकाऱ्यांना २५ फेब्रुवारीपूर्वी हे सीमांकन पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रक्रियेमुळे भूखंड क्रमांक २२४ वरील ४५७ भू-धारकांच्या मालकी हक्काचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, या सीमांकनामुळे ४५७ भूधारकांच्या जमिनीवर त्यांचा अधिकृत मालकी हक्क प्रस्थापित होईल. प्रत्येक घराला स्वतःचे स्वतंत्र आणि अधिकृत मालमत्तापत्रक मिळेल. सोबतच रहिवासी आता स्वतःच्या घरांचा पुनर्विकास किंवा दुरुस्ती करू शकतील. दुसरीकडे मालमत्तापत्रकामुळे घरांवर बँकेकडून शैक्षणिक किंवा व्यावसायिक कर्ज मिळणे सोपे होईल.
हा केवळ जमिनीच्या मोजणीचा विजय नाही, तर आमच्या पिढ्यानपिढ्यांच्या अस्तित्वाचा आणि अस्मितेचा विजय आहे. सीमांकनामुळे आमच्या घरांना कायदेशीर ओळख मिळणार असून, यामुळे आमच्या पुढच्या पिढीचे भविष्य सुरक्षित झाले आहे. वरळी कोळीवाड्याने दाखवलेली ही मशाल आता राज्यातील प्रत्येक कोळीवाड्याला आणि गावठाणाला आपला हक्क मिळवून देण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
- ॲड. गॉडफ्रे पिमेंटा, सामाजिक कार्यकर्ते
.......
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.