राज्यात कर्करोग नियंत्रणासाठी प्रयत्न

राज्यात कर्करोग नियंत्रणासाठी प्रयत्न

Published on

‘एकजूट होऊ या, कर्करोगाला हरवू या!’

कर्करोग नियंत्रणासाठी विशेष मोहीम
तीन कोटी नागरिकांची तपासणी; जागतिक कर्करोगदिन

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : राज्यात कर्करोगाचे रुग्ण दिवसागणिक वाढत आहेत. या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यात आतापर्यंत तीन कोटींहून अधिक नागरिकांची कर्करोगासाठीची तपासणी केली आहे. या मोहिमेत ३० वर्षांवरील नागरिकांची ४ फेब्रुवारी २०२५पासून तपासणी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये महिलांच्या मुख, गर्भाशयमुख व स्तन कर्करोगाच्या तपासणीवर विशेष भर देण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यभरात आतापर्यंत ३.०५ कोटी नागरिकांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ४१,१६९ संशयित रुग्ण आढळले आहेत. यामधून ५,९४४ बायोप्सी करण्यात आल्या असून, १,६७७ रुग्णांमध्ये कर्करोगाचे निश्चित निदान झाले आहे. यातील ४१६ रुग्णांवर सध्या सार्वजनिक आरोग्य संस्थांमध्ये उपचार सुरू आहेत. दरवर्षी ४ फेब्रुवारी या जागतिक कर्करोगदिनानिमित्त विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येते. यावर्षीचे जागतिक आरोग्य संघटनेचे घोषवाक्य ‘एकजूट होऊ या, कर्करोगाला हरवू या!’ असे आहे. गतवर्षी राज्यभर राबविण्यात आलेल्या या तपासणी मोहिमेत दोन कोटी ९२ लाख महिलांची तपासणी करण्यात आली होती. महाराष्ट्र कॅन्सर वॉरियर्स हा उपक्रम कर्करोग उपचार सेवांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. टाटा मेमोरियल रुग्णालयाचे माजी विद्यार्थी असलेल्या तज्ज्ञ ऑन्कोलॉजिस्ट व विशेषज्ञ डॉक्टरांचे हे स्वयंसेवी नेटवर्क असून, याअंतर्गत तज्ज्ञ डॉक्टर दर दोन महिन्यांनी जिल्हा रुग्णालयांना भेट देतात. गरजू रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये तपासणी, निदान व उपचार सेवा उपलब्ध करून दिली जाते. एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत उपक्रमांतर्गत १२,७५१ बाह्यरुग्ण, ६,८६६ अंतर्गत रुग्ण तसेच १,३६५ शस्त्रक्रिया सेवा पुरविण्यात आल्या आहेत. सध्या हा उपक्रम राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे.

कर्करोग निदान व्हॅन
कर्करोग तपासणी अधिक सुलभ व्हावी, यासाठी राज्यात कर्करोग निदान व्हॅन सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या राज्यातील प्रत्येक परिघासाठी एक अशा एकूण आठ तपासणी व्हॅन कार्यरत असून, त्याद्वारे राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये तपासणी होत आहे. फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत या व्हॅनद्वारे २.४७ लाख नागरिकांची मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगाची तपासणी करण्यात आली. यामधून १,३८३ बायोप्सी नमुने संकलित झाले असून ११२ रुग्णांमध्ये कर्करोग निश्चित झाला आहे.

कर्करोग डे केअर युनिट
कर्करोग रुग्णांना उपचारासाठी दूर प्रवास करावा लागू नये, यासाठी राज्यात कर्करोग डे केअर युनिट (केमोथेरपी केंद्र) सुरू करण्यात आली आहेत. सध्या राज्यात आठ केमोथेरपी केंद्र कार्यरत असून २,६८८ रुग्णांची नोंदणी करण्यात आली आहे.

फोटो - 614

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com