खंडाळा घाटात शेकडो वाहने अडकली
खंडाळा घाटात शेकडो वाहने अडकली
दोन्ही वाहिन्यांवर वाहतूक कोंडी
मुंबई, ता. ४ : खंडाळा घाटाच्या डोंगराळ भागात मंगळवारी (ता. ३) सायंकाळी गॅस टँकर उलटल्याने मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ३० तासांहून अधिक काळ ठप्प झाली. त्यामुळे शेकडो वाहने अडकून पडली आणि दोन्ही मार्गांवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली. अपघाताच्या ठिकाणी वाहने रात्रभर थांबून होती. महिला- मुलांसह प्रवाशांना अन्न, पाणी न मिळाल्याने साऱ्यांचे हाल झाले. बुधवारी (ता. ४) रात्री उशिरापर्यंत वाहतूक सुरू झाली नव्हती.
द्रुतगती मार्गावरील नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, अत्यंत ज्वलनशील प्रोपिलीन वायू घेऊन जाणारा गॅस टँकर मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास या व्यग्र महामार्गावर उलटला. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. टँकरमधून ज्वलनशील प्रोपीलीन वायूची गळती होत असल्याने परिस्थिती हाताळण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) आणि भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) यांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वाहतूक पूर्ववत होईपर्यंत ही मोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
अधिकाऱ्यांनी दुसरा टँकर आणला असून, उलटलेल्या वाहनातून गॅस हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू होती, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या संपूर्ण प्रक्रियेला दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागेल.
द्रुतगती मार्गावरील पुणे-मुंबई मार्गिका पूर्णपणे बंद करण्यात आली असून, वाहतूक दोन्ही शहरांमधील जुन्या महामार्गावर वळवण्यात आली आहे, असे ते म्हणाले. १५ ते २० मिनिटांचे थांबे देऊन, द्रुतगती मार्गाच्या पुणे मार्गिकेतून मुंबईच्या दिशेने वाहनांना वाहतुकीची परवानगी देण्यात आली आणि यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग हा भारतातील पहिला सहापदरी काँक्रीटचा, प्रवेश-नियंत्रित टोल मार्ग आहे. हा मार्ग ९४.५ किलोमीटर अंतराचा असून तो मुंबई, रायगड आणि नवी मुंबईला पुण्याशी जोडतो.
ही घटना रायगड जिल्ह्यातील आदोशी बोगद्याजवळ घडली, जेव्हा कथितरीत्या भरधाव वेगाने जाणारा टँकर उतारामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन उलटला. अपघातानंतर लगेचच टँकरमधून गॅसची गळती होत असल्याचे आढळून आले, ज्यामुळे वाहनचालकांमध्ये घबराट पसरली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. खबरदारीचा उपाय म्हणून, कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद केली.
मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सुमारे दोन किलोमीटरच्या पट्ट्यासाठी पुणेबाजूच्या मार्गावर वळवण्यात आली होती. तथापि, टँकरमधून सतत वायू गळती होत असल्याने सामान्य वाहतूक पूर्ववत होऊ शकली नाही. परिणामी, पुणेबाजूने जाणाऱ्या वाहनचालकांनाही लांबच लांब रांगा आणि संथ वाहतुकीचा सामना करावा लागला, असे द्रुतगती मार्गावरील नियंत्रण कक्षातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
...
प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले...
- एका एसटीचालकाने सांगितले, की त्याची बस आदोशी बोगद्याजवळ वाहतूक कोंडीत नऊ तास अडकली होती आणि अखेरीस बुधवारी पहाटे ३ वाजता नवी मुंबईतील पनवेल येथे पोहोचली. आम्हाला द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कारण आमची बस अपघातस्थळापासून काही मीटर अंतरावर तासन्तास अडकली होती. शौचालयांच्या अनुपलब्धतेमुळे महिला प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाला, असे तो चालक म्हणाला. विक्रेते १० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीसाठी ३० रुपये आकारत होते, असेही त्याने सांगितले.
- एका एसटीच्या वाहकाने सांगितले, की त्यांचे वाहन अपघातस्थळाजवळ सहा तासांहून अधिक काळ थांबले होते, ज्यामुळे प्रवाशांना अन्न, पाणी आणि शौचालयाच्या सुविधांशिवाय राहावे लागले.
- अपघातानंतर १७ तासांहून अधिक वेळ झाला तरी हजारो वाहनांमध्ये असंख्य नागरिक, महिला, मुले या मार्गावर कोणत्याही सुविधेविना अडकून पडली आहेत, असे अमित परेकर या प्रवाशाने म्हटले आहे.
- वाहतूक सुरळीत होईपर्यंत खालापूर टोलनाक्यावरची टोलवसुली तत्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी प्रवासी अमरेंद्र जोशी यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

