ठाकरेंची शिवसेना महापौरपदासाठी मैदानात

ठाकरेंची शिवसेना महापौरपदासाठी मैदानात

Published on

ठाकरेंची शिवसेना महापौरपदासाठी मैदानात

संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदांसाठी ११ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत खासदार संजय राऊत यांनी दिले आहेत.

खासदार संजय राऊत यांनी यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुंबईवर भाजपचा महापौर बसणे हा महाराष्ट्र आणि १०६ हुतात्म्यांच्या बलिदानाचा अपमान असून तो राज्यासाठी ‘काळा दिवस’ ठरेल,’ अशा शब्दांत राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

२५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. शिवसेनेत पडलेली फूट आणि बदललेल्या राजकीय समीकरणांनंतर पहिल्यांदाच महापौरपदासाठी निवडणूक होत आहे. सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीचा महापौर बसणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. यात महापौरपद भाजपकडे, तर उपमहापौरपद शिंदे गटाच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले, ‘भाजपने मुंबईचे अस्तित्व आणि अस्मिता संपवण्याचे कारस्थान रचले आहे. एकनाथ शिंदे यांच्या मदतीने भाजपचा महापौर मुंबईवर लादणे हे मराठी माणसासाठी अत्यंत दुःखद आहे. भविष्यात मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे. भाजपला मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करायची आहे.’
​-----
ठाकरेंच्या भूमिकेमुळे निवडणूक अटळ
राजकीय वर्तुळात ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महायुतीकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता होती. ठाकरे गटाने निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतल्याने आता प्रत्यक्ष मतदान होण्याची चिन्हे आहेत. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असले तरी ठाकरे गट या निवडणुकीच्या माध्यमातून आपली राजकीय ताकद आणि मुंबईवरील दावा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com