शुभम लोणकर मुख्य सूत्रधार
शुभम लोणकर मुख्य सूत्रधार

शुभम लोणकर मुख्य सूत्रधार शुभम लोणकर मुख्य सूत्रधार

Published on

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरण : किकर

शुभम लोणकर मुख्य सूत्रधार

शस्त्रे पुरविणाऱ्यास पुण्यातून अटक


मुंबई, ता. ५ : चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शुभम लोणकर असल्याचा दावा गुन्हे शाखेने गुरुवारी केला. लोणकरने या हल्ल्याचा कट आखला, तो पूर्ण करण्यासाठी साथीदारांची जुळवाजुळव केली. त्यांना अर्थसहाय्य आणि शस्त्रसाठा उपलब्ध करून दिल्याचे पुरावे हाती लागले आहेत. शस्त्रे पुरविणाऱ्या आसाराम फासले याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे, असे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

लोणकर बाबा सिद्दीकी हल्ला प्रकरणातील सूत्रधार असून, कुख्यात लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार आहे. शेट्टी यांच्या घरावरील हल्ल्याची जबाबदारी लोणकर याचे नाव असलेल्या फेसबुक खात्यावरून स्वीकारण्यात आली होती. गेल्या आठवड्यात शनिवारी मध्यरात्री जुहू येथील शेट्टींच्या निवासस्थानी लोणकरच्या इशाऱ्यावरून पाच गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडणाऱ्यांसह लोणकर अद्याप गुन्हे शाखेच्या हाती लागलेले नाहीत. घटनेनंतर गुन्ह्यात वापर झालेल्या दुचाकीआधारे गुन्हे शाखेने पुण्यातून स्वप्नील सकट, समर्थ पोमाजी, सिद्धार्थ येनपुरे आणि आदित्य गायकी या लोणकरच्या चार साथीरांना बेड्या ठोकल्या.

अटकेनंतर आरोपी सकट याच्या वडगाव येथील घराची झडती घेतली असता एक पिस्तूल, तीन मॅगझिन आणि एक एअर गन असा शस्त्रसाठा गुन्हे शाखेला सापडला. चौकशीत गुन्हा घडण्यापूर्वी लोणकरच्या सूचनेवरून आसाराम फासले याने हा शस्त्रसाठा सकटला दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार गुन्हे शाखेने वारजे, माळवाडी येथून फासले यास गुरुवारी सकाळी अटक केली. फासलेने गुन्हा घडण्यापूर्वी सकटला तीन पिस्तूल, तीन मॅगझिन दिल्याचे कबूल केले. त्यावरून याच साठ्यातील एका शस्त्राने शेट्टी यांच्या घरावर गोळीबार झाल्याचा दाट संशय गुन्हे शाखेकडून वर्तविण्यात आला.

आर्थिक व्यवहार उघड
कुख्यात लॉरेंस बिश्नोईचा साथीदार आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार आरोपी शुभम लोणकर याने शेट्टी यांच्या घरावर गोळीबार घडवून आणण्यासाठी आरोपी सकटसह पुण्यातील अन्य तीन साथीदारांना आर्थिक रसद पुरवल्याचे पुरावे गुन्हे शाखेच्या हाती लागले आहेत. याच रकमेतून पुण्यातील साथीदारांनी दुचाकी, शस्त्रसाठा आणि अन्य आवश्यक वस्तू गोळा केल्या. ही रक्कम लोणकरने आपल्या साथीदारांपर्यंत कशी, कोणत्या माध्यमातून पोहाेचवली, याचा तपास सुरू असल्याचे गुन्हे शाखेतून सांगण्यात आले.

अटकेपूर्वी सिग्नल ॲप उडवले
पुण्यातून अटक केलेल्यांपैकी दोन आरोपी फरार लोणकरसोबत सिग्नल ॲपद्वारे संपर्कात होते. एकमेकांसोबत संपर्कासाठीही हे आरोपी याच ॲपचा वापर करत. शेट्टी यांच्या घरावर गोळीबाराचा कट पूर्ण होताच या चौघांनी मोबाईलमधील सिग्नल ॲप उडवले. गुन्हे शाखेकडून या ॲपद्वारे आरोपींनी एकमेकांना पाठवलेले संदेश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पुरावे नष्ट केल्याचे कलम
आरोपींचे संगनमत, कट स्पष्ट करणारे सिग्नल ॲप उडवल्याने याप्रकरणी नोंद गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेतील २३८ कलम जोडण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com