राज्यात अपघातांत ५७ टक्‍के बळी दुचाकीस्वारांचे

राज्यात अपघातांत ५७ टक्‍के बळी दुचाकीस्वारांचे
Published on

राज्यात अपघातांत ५७ टक्‍के बळी दुचाकीस्वारांचे
पादचाऱ्यांचेही २१ टक्‍के मृत्यू; परिवहन विभागाचे ‘दुचाकीस्वार-पादचारी वाचवा’ अभियान जाहीर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : राज्यातील रस्ते अपघातात २०२५मध्ये झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये ५७ टक्के दुचाकीस्वार तर २१ टक्के मृत्यू पादचाऱ्यांचे आहेत. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचे अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी परिवहन विभागाने दुचाकीस्वार, पादचारी वाचवा अभियान २०२६ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांना निर्देश दिले आहेत.
वर्ष २०२५ मधील प्राथमिक आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण ३६ हजार ४५० पेक्षा जास्त अपघात झाले. त्यामध्ये सुमारे १५ हजार ५४९ नागरिकांचा मृत्यू, तर ३२ हजार १४७ हून अधिक नागरिक जखमी झाले. जागतिक स्तरावर रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण वर्ष २०३० पर्यंत ५० टक्क्यांपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, रस्ते अभियांत्रिकी, अंमलबजावणी आणि जनजागृतीवर भर देणे आवश्यक आहे. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या रस्ते अपघात आढावा बैठकीत राज्यातील अपघातांचे विश्लेषण केले असता अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले.

उपाययोजना काय?
१. हेल्मेट सक्ती : ज्या महामार्गावर सर्वात जास्त दुचाकीचे अपघात घडतात अशा जिल्ह्यातील पहिल्या तीन प्रमुख राष्ट्रीय/राज्य महामार्गांवर हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करावी. त्यानंतर टप्प्याटप्प्याने उर्वरित अपघातग्रस्त रस्त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी.
२. अपघात विश्लेषण : रस्ता सुरक्षा कक्षांतर्गत संबंधित पोलिस ठाणे क्षेत्र प्रभारी मोटार वाहन निरीक्षकांनी एफआयआरद्वारे अपघाताच्या कारणांचा सखोल अभ्यास व विश्लेषण करावे.
३. अपघातग्रस्त ठिकाणांचे नकाशे तयार करणे : गेल्या तीन वर्षांतील अपघात स्थळांची माहिती गुगल मॅपवर प्लॉट करून त्याची तुलना करून अपघातग्रस्त ठिकाणांची तीव्रता शोधावी. सुसूत्रतेसाठी रंगसंगतीचा वापर अनिवार्य आहे.
४. रडार आधारित इंटरसेप्टर वाहनांची नियुक्ती व हेल्मेट सक्ती : जिल्ह्यातील महामार्गावरील सर्वाधिक अपघात घडणारे पहिले तीन रस्ते निश्चित करून फक्त त्याच रस्त्यांवर अपघातग्रस्त ठिकाणी रडार आधारित इंटरसेप्टर वाहने तैनात करावीत.
५. सर्व टोलनाक्यांवर बोर्ड बसविणे : टोलनाक्यावरील डावीकडची लेन दुचाकीसाठी निर्धारित असते. या ठिकाणी ‘हेल्मेट नाही, तर प्रवेश नाही’ अशा आशयाचे फलक लावावेत.
६. जॅमर खरेदी व अंमलबजावणी : अंमलबजावणी पथकाद्वारे वाहने अटकावून ठेवण्यासाठी जॅमरचा वापर करावा.
७. अनुज्ञप्ती चाचणी व्हिडिओ विश्लेषण : ज्या मोटार वाहन निरीक्षकांचा अनुज्ञप्ती चाचणी नापासचा निकाल परिवहन आयुक्त कार्यालयाने वेळोवेळी निर्धारित टक्केवारीपेक्षा कमी आहे, अशा मोटर वाहन निरीक्षकांचा तसेच इतर सर्व मोटार वाहन निरीक्षकांचा व्हिडिओ डेटा कार्यालय प्रमुखांनी स्वतः तपासावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com