

प्रकल्प व्यवस्थापन समिती स्थापन करणार
रुग्णालये, शाळा, उद्यानांच्या कामांना मिळणार तांत्रिक बळ
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : शहरातील विविध विकासकामांचे नियोजन आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. पालिकेच्या मुख्य वास्तुविशारद विभागातर्फे ‘प्रकल्प व्यवस्थापन समिती’ तयार करण्यात येणार असून, यासाठी अनुभवी कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळातील रुग्णालये, शाळा आणि उद्यानांच्या कामांना तांत्रिक बळ मिळणार आहे.
महापालिकेतर्फे दरवर्षी शेकडो नवीन प्रकल्प आणि जुन्या इमारतींच्या दुरुस्तीची कामे हाती घेतली जातात. या प्रकल्पांचे शास्त्रोक्त सर्वेक्षण, स्थापत्य नियोजन, संरचना आराखडा आणि प्रत्यक्ष कामावर देखरेख करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागारांची आवश्यकता असते. याच पार्श्वभूमीवर पालिकेने अनुभवी संस्थांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
या समितीद्वारे प्रामुख्याने पालिकेची रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने, कर्मचारी निवासस्थाने, प्रशासकीय इमारती, नाट्यगृहे, स्मशानभूमी, क्रीडा संकुले, शाळा, बाजारपेठा आणि उद्याने अशा विविध ठिकाणच्या कामांचे व्यवस्थापन केले जाणार आहे. पालिकेने कामाच्या व्याप्तीनुसार ए ते डी आणि दुरुस्ती कामांसाठी आर अशा पाच श्रेणींमध्ये सल्लागारांची विभागणी केली आहे. ज्या संस्थांकडे तीन ते १० वर्षांचा अनुभव आणि विहित उलाढाल आहे, अशा संस्था वरळी येथील इंजिनीअर्स हब कार्यालयात आपले अर्ज सादर करू शकतील. प्राप्त अर्जांची छाननी करून पुढील निवड प्रक्रिया राबवली जाईल. मुंबईतील नागरी सुविधांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी ही सल्लागार समिती महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मुख्य वास्तुविशारद विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
ही कामे करणार
निवडल्या जाणाऱ्या सल्लागारांना प्रकल्पाचा सविस्तर अहवाल तयार करण्यापासून ते विविध शासकीय विभागांच्या परवानग्या मिळवून देण्यापर्यंतची सर्व जबाबदारी पार पाडावी लागेल. तसेच निविदा कागदपत्रे तयार करणे आणि कामाच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवणे हे त्यांचे मुख्य काम असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.