

रहिवाशांच्या समाधानानंतरच ठेकेदारांना कामाचे पैसे
मकरंद नार्वेकरांकडून ‘पॉवर टू द पीपल’; रहिवाशांचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य
मुंबई, ता. १२ (सकाळ वृत्तसेवा) ः महापालिका निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करीत भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी कफ परेड परिसरातील नागरी विकासासाठी एक वेगळे आणि पारदर्शक पाऊल उचलले आहे. नगरसेवक निधीतून होणाऱ्या विकासकामांचे नियोजन आणि प्रस्तावांचे अधिकार आता थेट रहिवाशांना दिले जात असून, रहिवाशांच्या समाधानानंतरच ठेकेदारांना कामाचे पैसे दिले जातील, असे नार्वेकर यांनी जाहीर केले.
बुधवारी कफ परेड फेडरेशनला पाठविलेल्या अधिकृत पत्रात नार्वेकर यांनी रहिवाशांना परिसराच्या विकासात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. या नव्या निर्णयानुसार परिसरातील रस्तेदुरुस्ती, नालेसफाई, पथदिवे आणि सौंदर्यीकरण यांसारख्या कामांची माहिती फेडरेशनच्या लेटरहेडवर नार्वेकर यांना दिली जाईल. या प्रस्तावांना महापालिकेची मंजुरी मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
या उपक्रमाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ठेकेदारांच्या देयकावर रहिवाशांचे नियंत्रण असणार आहे. नार्वेकर म्हणाले, की काम पूर्ण झाल्यानंतर रहिवाशांकडून ‘काम समाधानकारक झाले आहे’ असे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय महापालिका ठेकेदाराला देयक देणार नाही. निकृष्ट काम आणि विलंब टाळण्यासाठी ही विशेष व्यवस्था राबविली जात आहे.
सार्वजनिक पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी आणि महापालिकेकडून स्थानिकांच्या गरजा विचारात न घेता होणारी विकासकामे रोखण्यासाठी नार्वेकर यांनी ‘पॉवर टू द पीपल’ या संकल्पनेवर भर दिला आहे. कफ परेडमध्ये हा उपक्रम यशस्वी झाला की, हा पॅटर्न संपूर्ण कुलाबा परिसरात राबविला जाईल, असेही त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे स्थानिक प्रशासनात नागरिकांचा थेट हस्तक्षेप वाढेल, ठेकेदारांची जबाबदारी ठाम होईल आणि कफ परेड परिसर जागतिक दर्जाच्या सुविधांनी सजविण्यास एक क्रांतिकारी पाऊल उचलले जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.