गिरगाव चौपाटीवरील ‘व्ह्यूइंग गॅलरी’त आता खवय्यांची चंगळ
गिरगाव चौपाटीवरील ‘व्ह्युइंग गॅलरी’त आता खवय्यांची चंगळ
कॅफेटेरियासाठी ९.९३ कोटींची निविदा प्रसिद्ध; १० वर्षांच्या करारावर चालवण्यास मिळणार जागा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : मुंबईची शान असलेल्या गिरगाव चौपाटीवरील ‘स्व. प्रमोद नवलकर व्ह्युइंग गॅलरी’ आता पर्यटकांच्या मनोरंजनासोबतच खवय्यांसाठीही सज्ज होणार आहे. या गॅलरीमध्ये प्रशस्त कॅफेटेरिया आणि व्यावसायिक जागा चालवण्याचे अधिकार देण्यासाठी महानगरपालिकेने ९.९३ कोटी रुपयांची भव्य निविदा प्रसिद्ध केली आहे.
अरबी समुद्राचे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी गिरगाव चौपाटीवर ही अत्याधुनिक व्ह्युइंग गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीच्या पहिल्या मजल्यावर असलेला कॅफेटेरिया चालवण्यासाठी पालिकेने अनुभवी कंत्राटदारांकडून प्रस्ताव मागवले आहेत. हे कंत्राट पुढील १० वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. यामध्ये केवळ खाद्यपदार्थ विक्रीच नव्हे, तर गॅलरीच्या स्वच्छतेची आणि देखभालीची जबाबदारीही संबंधित कंत्राटदारावर असण्याची शक्यता आहे.
यापूर्वीदेखील या कॅफेटेरियासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे आणि निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या प्रक्रियेला विलंब झाला होता. आता पालिकेने अटी-शर्तींमध्ये आवश्यक सुधारणा करून फेब्रुवारी २०२६ च्या पहिल्या आठवड्यात ही ९.९३ कोटींची नवीन निविदा प्रसिद्ध केली आहे.
निविदेची अंदाजित किंमत ९.९३ कोटी
निविदा भरण्याची अंतिम मुदत ४ मार्च २०२६ आहे. इच्छुकांना आपली निविदा स्व. प्रमोद नवलकर व्ह्युइंग गॅलरी, गिरगाव चौपाटी येथे भरता येणार आहे. गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या व्ह्युइंग गॅलरीमध्ये जागतिक दर्जाचा कॅफेटेरिया सुरू झाल्यामुळे पर्यटकांना समुद्राच्या लाटांचा आनंद घेत दर्जेदार खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. यामुळे पालिकेच्या महसुलातही भर पडणार आहे, असे इस्टेट विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या निविदा प्रक्रियेमुळे गिरगाव चौपाटीच्या सौंदर्यात आणि पर्यटन मूल्यात अधिक भर पडणार असून, मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत या कॅफेटेरियाचे काम प्रत्यक्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

