बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा
बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा
वाहतूक पोलिसांकडून १३ दिवसांत ८१५ रिक्षा जप्त; दीड कोटींची तडजोड रक्कम वसूल
मुंबई, ता. १७ : मुंबईतील रस्त्यांवर शिस्त राखण्यासाठी आणि नियम धाब्यावर बसवणाऱ्या रिक्षाचालकांना धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ४ ते १६ फेब्रुवारी या अवघ्या १३ दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी ३६,१५३ ई-चालने जारी केली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८१५ रिक्षा जप्त केल्या आहेत.
मुंबईकरांना दैनंदिन प्रवासात भेडसावणारी ‘भाडे नाकारण्याची’ समस्या या मोहिमेच्या केंद्रस्थानी होती. या काळात प्रवासास नकार देणाऱ्या तब्बल २३,७४४ चालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या ८,४६९ रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांकडून जादा भाडे उकळणाऱ्या ४५६ चालकांनाही ई-चलान देण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांनी केवळ नवीन कारवायाच केल्या नाहीत, तर प्रलंबित ई-चलानांची वसुलीही कडक केली. या मोहिमेदरम्यान प्रलंबित दंडाची एकूण एक कोटी ४७ लाख २४ हजार ७३१ रुपये इतकी तडजोड रक्कम वसूल करण्यात आली, तर नवीन ई-चलानांची रक्कम ९७ लाख ४९ हजार ७०० रुपये इतकी आहे.
परवाना निलंबनाची शिफारस
मुंबईत सुमारे दीड लाख रिक्षाचालक आहेत. त्यापैकी काही चालकांच्या बेशिस्त वर्तणुकीमुळे अपघातांचा धोका वाढतो आणि प्रवाशांची गैरसोय होते. यापुढे ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून, वारंवार नियम मोडणाऱ्या चालकांचे परवाने निलंबित करण्यासाठी परिवहन विभागाकडे शिफारस केली जाणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
कारवाईची आकडेवारी
गुन्ह्याचा प्रकार केसेस / संख्या
भाडे नाकारणे २३,७४४
जादा प्रवासी वाहतूक ८,४६९
जादा भाडे आकारणी ४५६
जप्त केलेल्या रिक्षा ८१५
एकूण ई-चलानांची संख्या ३६,१५३
ई-चलानांची एकूण रक्कम ९७,४९,७०० रुपये
प्रलंबित दंडवसुली (तडजोड) १,४७,२४,७३१ रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

