शिव जयंती विशेष
‘शिवराईं’चे जतन करणारा शिलेदार
असंख्य नाणी, तलवारींसह ऐतिहसिक ठेवींचा संग्रहकार
मयूर फडके, सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. १८ : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून मराठी मातीलाच नव्हे, तर संस्कृतीला, प्रशासनाला एक नवी दिशा दिली. मग ते शिवराज्याभिषेकापासून शकाची निर्मिती असो किंवा स्वराज्याच्या चलनाची, होन (सोन्याची नाणी) आणि शिवराई निर्मितीची. महाराज सर्वार्थाने द्रष्टे शासक होते, पण महाराजांची ही स्वराज्यलक्ष्मी काळाच्या ओघात नष्ट होऊ नये म्हणून अनेक शिलेदार ती आजही जतन करीत असून, राजा जाधव त्याच शिलेदारांपैकी एक आहेत. जाधव यांच्याकडे विभिन्न प्रकारची नाणी आहेत. त्यातूनच त्यांची नाण्यांप्रती गोडी वाढत गेली आणि त्यांच्याकडे ‘नाणीसंग्रह’ तयार झाला.
जाधव हे १९८२ पासून नाण्यांचा संग्रह करत आहेत. योगायोगाने गंगोत्रीला गेलेले असताना त्यांच्या या संग्रहाचा श्रीगणेशा शिवराई जमवूनच झाला. शिवकाळातला होन आता काळाच्या ओघात दुर्मिळ झाला असला तरीही सामान्यांच्या व्यवहारासाठी सुरू केलेली शिवराई मात्र मुबलक सापडते. शत्रूवर विजय मिळाल्याच्या आनंदात कधीकाळी उधळलेल्या या शिवराया अजूनही गड किल्ल्यांवर, शिवकालीन वाड्यांमध्ये सापडतात, असे जाधव यांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात गडावरून वाहून येणाऱ्या पाण्यासोबत जमा होणाऱ्या शिवराया झाडकरी गोळा करत, त्यांच्याकडूनही आपल्याला अनेक शिवकालीन नाणी मिळाल्याचे जाधव सांगतात.
-------------
सहा हजार शिवराई
आतापर्यंत जवळपास सहा हजारांहून अधिक शिवराई नाणी जाधव यांच्याकडे आहेत. त्यावर मनुष्याकृती, पशु-पक्षी, हत्यारे, झाडे ते चंद्र-सूर्यापर्यंतची चिन्हे, चित्रे अंकित आहेत. लहान आणि मोठ्या अशा दोन प्रकारांत असलेल्या शिवराईपैकी मोठ्या शिवराईचे वजन हे आठ ग्रॅम, तर लहान शिवराईचे वजन चार ग्रॅम आहे. या शिवराईंचे अक्षर वळण साधारणतः सारखेच असून, त्यावरील उल्लेख हा पुढील बाजूने तीन ओळींत ‘श्री-राजा-शिव’ आणि मागील बाजूला ‘छत्र-पति’ असा असल्याचे आढळून येते, तर ‘श्री-राजा-शिव ,छत्र-पति’ या मजकुराव्यतिरिक्त पुढील बाजूला ‘ श्री -राजा-शीव’, ‘श्री-राजा-सिव’, ‘श्री-राजा-सीव’ असलेल्या शिवराईदेखील सापडतात. असे १५१ ते १५२ शिवराईंचे प्रकार असल्याचे जाधव सांगतात.
दीड लाखांहून अधिक नाणीसंग्रह
अत्यंत दुर्मिळात दुर्मिळ अशी जवळजवळ दीड लाखाहून अधिक नाणी जाधवांकडे आहेत. अकबराची चांदीची नाणी, अकबर दाम, औरंगजेब, शहाआलम (एक आणि दोन), शहाजहान, इस्ट इंडिया कंपनी, राणी एलिझाबेथ, यादव कालीन, मोहम्मद तुघलक, भारतीय स्वातंत्र्यापूर्वीच्या विशिष्ट नाण्यांसह अनेक ऐतिहासिक दस्तऐवज त्यांच्या नालासोपाऱ्यातील राहत्या घरातील संग्रहालयात आहेत. जाधवांकडे युद्धात वापरलेल्या तीन धोप तलवारी तसेच गेंड्याच्या कातडीपासून बनविलेली ढालही आहे. नर, मादी शंख, क्रिस्टल (स्फटिक) ऐतिहासिक नक्षीकाम असलेली भांडी. राजस्थान, मध्य प्रदेशातील मोठ्या आकाराचे हंडे, कमंडलु, जुन्या काळातील सोने-चांदी मोजणारी परिमाणे, ११ किलो वजनाची कोळशाची इस्त्री, अडकित्ते असून, २४६ हून अधिक सम आणि विषम वातींच्या पुरातन काळातील समया आणि पेशवेकालीन लामण दिव्याचाही त्यांच्या संग्रहालयात समावेश आहे.
पुरंदरे, उद्धव ठाकरेंची भेट
त्यांचा हा संग्रहाला दस्तुरखुद्द शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जाधव यांच्या घरी भेट दिली आहे. भविष्यात त्यांना या सर्वांचे प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

