

एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होणार
यंदा ८,३०० नवीन बस ताफ्यात दाखल करणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : दैनंदिन एक ते दीड कोटी रुपयांची तूट सहन करत आर्थिक दडपणाखाली असलेल्या एसटीला नवसंजीवनी देण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. बसची कमतरता हा मुख्य अडथळा दूर करत यंदा तब्बल आठ हजार ३०० नवीन बस ताफ्यात सामील करण्याचा निर्धार परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
बस वाढल्या तर प्रवासी वाढतील आणि प्रवासी वाढले तर उत्पन्न आपोआप वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोरोना महामारीपूर्वी एसटीकडे १८ ते १९ हजार बस होत्या. दररोज सुमारे ६६ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते; मात्र महामारी आणि दीर्घकालीन कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या चार-पाच वर्षांत बसखरेदी रखडली. परिणामी, २०२४ अखेर बसची संख्या घटून सुमारे १२,६०० वर आली. दरम्यान, राज्य शासनाने महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत आणि ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास दिल्याने प्रवाशांचा ओघ पुन्हा वाढला. सध्या दररोज सुमारे ५० लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात; मात्र अनेक मार्गांवर फेऱ्या अपुऱ्या पडत आहेत. एसटीच्या दीर्घकालीन धोरणानुसार पुढील काही वर्षांत २० ते २५ हजार बस खरेदी करण्याचा मानस आहे. त्यास राज्य शासनाची तत्वतः मान्यता मिळाली आहे.
दुर्गम व आदिवासी भागांसाठी १०० मिडी बस
यंदा पहिल्या टप्प्यात ८,३०० बस दाखल होणार आहेत. त्यामध्ये ३,००० ‘३x२’ आसन रचनेच्या ५५ आसनी बस असतील. मार्चपासून टप्प्याटप्प्याने त्यांचे आगमन होणार आहे. या बसना ‘राजमाता जिजाऊ साहेब’ यांचे नाव देण्यात आले असून दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर धावणार आहेत. ५,००० साध्या बस निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहेत. १०० मिडी बस दुर्गम व आदिवासी भागांपर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी असणार आहेत.
==
खासगी वाहतुकीशी स्पर्धा २०० अत्याधुनिक बस
खासगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी या सर्व बस ताफ्यात आल्यावर दररोज ७० ते ७५ लाख प्रवासी वाहतुकीचे लक्ष्य गाठण्याचा महामंडळाचा मानस आहे. त्यासाठी २०० अत्याधुनिक बस घेण्यात येणार आहेत.
==
खर्च-उत्पन्नाचा ताळमेळ साधण्याचा निर्धार
सध्या एसटीचा दैनंदिन खर्च ३४ ते ३५ कोटी रुपये, तर उत्पन्न सुमारे ३३ कोटी रुपये आहे. म्हणजेच रोजची तूट एक ते दीड कोटींच्या घरात आहे. एसटी हा नफा कमावणारा उद्योग नाही; ती राज्यातील सर्वसामान्यांसाठी जीवनवाहिनी आहे; मात्र किमान तोटा टाळण्यासाठी खर्च-उत्पन्नाचा समतोल साधणे आवश्यक आहे. नवीन बस आल्यावर उत्पन्न निश्चित वाढेल आणि एसटी आर्थिकदृष्ट्या सुदृढ होईल, असे मंत्री सरनाईक म्हणाले.
==
ग्रामीण भागातील मुक्कामी फेऱ्या, आदिवासी पाड्यांपर्यंत सेवा, दोन शहरादरम्यान गर्दीच्या मार्गांवर अतिरिक्त गाड्या या सर्वांमुळे एसटीची पकड पुन्हा मजबूत होणार आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लाल परी’ आता नव्या जोमाने, नव्या ताफ्यासह आणि नव्या आर्थिक बळावर पुन्हा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. यावर्षाअखेर एसटी आर्थिक गर्तेतून बाहेर येईल, हा आमचा दृढ विश्वास आहे.
- प्रताप सरनाईक, परिवहनमंत्री
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.