

वरिष्ठ निरीक्षक, उपनिरीक्षक अटकेत
लाच घेतल्याबद्दल एसीबीची कारवाई; बेहिशोबी रोकडही सापडली
मुंबई, ता. १९ ः लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बुधवारी सापळा रचून लाच स्वीकारताना दोन अधिकाऱ्यांना रंगेहाथ पकडले. यात कुरार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजीव तावडे यांच्या शासकीय कार्यालयात (केबिन) ६.३४ लाखांची बेहिशोबी रोकड सापडली. याप्रकरणी बुधवारी रात्री तावडे आणि त्यांचे सहकारी उपनिरीक्षक ज्ञानेश्वर जुन्ने यांना अटक करण्यात आली.
पोलिस ठाण्यातील दोघांच्या कक्षात आणि निवासस्थानाची झाडाझडती घेण्यात आली. तेव्हा तावडे यांच्या कक्षातून ६.३४ लाखांची रोकड सापडली. ती जप्त करून त्याबाबत तावडेंकडे चौकशी सुरू केल्याचे एसीबी प्रवक्त्याने स्पष्ट केले. दोघांच्या उत्पन्नाचे ज्ञात स्रोत आणि त्यांची व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या मालमत्ता तपासल्या जाणार आहेत. गुरुवारी दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना २३ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार कुरार पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यातच तक्रारदाराच्या भावाने लैंगिक शोषणाची तोंडी तक्रार पोलिसांकडे केली. या दोन्ही प्रकरणात कारवाई न करण्यासाठी तावडे आणि जुन्ने यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी दोन लाख रुपये तक्रारदाराने तत्काळ दिले. दोन्ही प्रकरणे मिटवण्यासाठी उर्वरित एक लाख रुपयांसाठी दोघांनी तक्रारदाराकडे तगादा लावला. तेव्हा त्याने एसीबीकडे तक्रार दिली. त्या आधारे एसीबीने बुधवारी पडताळणी केली. तक्रारीत तथ्य आढळल्याने सापळा रचण्यात आला. त्यात तावडे यांच्या संमतीने जुन्ने याला एक लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ सापडले.
या आधीच्या कारवाया
सप्टेंबर २०२५ मध्ये वडाळा टीटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे आणि उपनिरीक्षक राहुल वाघमोडे यांना एसीबीने अटक केली होती. एका प्रकरणात गुन्हा न नोंदण्यासाठी दोघांनी एकूण ५.५० लाखांची लाच मागितली. त्यातील काही रक्कम स्वीकारली. उर्वरित रक्कमेतील दोन लाख स्वीकारताना सरोदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. यानंतर पोलिस आयुक्तांनी दोघांना तातडीने निलंबित केले, तर महासंचालक कार्यालयाने दोघांना सेवेतून कमी केले.
मे २०२५ मध्ये शिवाजी नगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक बाबुराव देशमुख यांना एक लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. परिसरातील एका शैक्षणिक संस्थेत अज्ञात व्यक्तींनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याबाबत संस्थेच्या विश्वस्ताने पोलिस तक्रार केली. शाळेला सुरक्षा पुरवण्यासह विरोधकांविरोधात गुन्हा नोंदवून अटक करण्यासाठी देशमुख यांनी तीन लाखांची लाच मागितली. त्यातील पहिला हप्ता घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
पोलिस दलातील १२० प्रकरणे
दरवर्षी लाचखोरीत महसूल विभाग पाहिला असतो. २०२५ मध्येही महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची १६८ प्रकरणे एसीबीने पकडली. त्यात एकूण ६१.८९ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कारवाई झाली. त्या खालोखाल पोलिस दलातील १२० प्रकरणे एसीबीने पकडली. त्यात ९१.२८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना अधिकारी, अंमलदारांना अटक झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.