गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि जतन हा ''लोकमंत्र'' व्हावा; सिद्धेश कदम यांचे प्रतिपादन

गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि जतन हा ''लोकमंत्र'' व्हावा; सिद्धेश कदम यांचे प्रतिपादन

Published on

स्वच्छता आणि जतन ‘लोकमंत्र’ व्हावा
गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
​मुंबई, ता. २० ः युनेस्कोने जागतिक वारसास्थळाचा दर्जा दिलेल्या राज्यातील ११ ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने कंबर कसली आहे. ‘मानाचा मुजरा, हटवूया कचरा’ या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ शिवजयंतीच्या औचित्याने किल्ले सुवर्णदुर्ग येथे करण्यात आला. या वेळी मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी गडकिल्ल्यांची स्वच्छता आणि जतन ही मोहीम आता ‘लोकमंत्र’ होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
​राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबवण्यात येत आहे. युनेस्कोच्या यादीत समावेश झालेल्या रायगड, प्रतापगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, राजगड, पन्हाळा, साल्हेर, लोहगड, सुवर्णदुर्ग, शिवनेरी आणि खंदेरी या ११ किल्ल्यांवर ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे गडकिल्ले स्वच्छता व संवर्धन’ मोहीम राबवणार आहे.

शिवप्रेमी संस्थांचा सहभाग
​​या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे ही केवळ सरकारी मोहीम नसून यात शिवप्रेमी संस्थांचा सहभाग असेल. ​या ११ गडकिल्ल्यांच्या परिसरात कार्यरत असलेल्या स्थानिक सामाजिक संस्थांच्या सहकार्याने वर्षभर स्वच्छता मोहीम राबवली जाईल. ​या कामासाठी संबंधित संस्थांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आर्थिक अनुदानदेखील दिले जाणार आहे.​ या संपूर्ण मोहिमेचे नियोजन मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंदर सिंह (भा.प्र.से.) करीत आहेत.

उपक्रम मार्गदर्शक ठरेल
​जागतिक वारसास्थळ घोषित झाल्यामुळे या किल्ल्यांवर पर्यटकांची संख्या वाढणार आहे. पर्यटकांकडून होणारा प्लॅस्टिक कचरा (पाण्याच्या बाटल्या, रॅपर्स) ही मोठी समस्या आहे. युनेस्कोच्या वार्षिक पाहणी अहवालात दर्जा आणि गुणवत्तेचे निकष टिकवण्यासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ​या वेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, की सुवर्णदुर्ग येथून सुरू झालेला हा उपक्रम राज्यातील इतर किल्ल्यांसाठी मार्गदर्शक ठरेल. या कार्यक्रमाला एम. देवेंदर सिंह, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम आणि जय शिवराय प्रतिष्ठानचे सदस्य व मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com