निवृत्त बँक व्यवस्थापकाचे संपूर्ण कुटुंब १८ दिवस आभासी अटकेत
कुटुंब १८ दिवस आभासी अटकेत
निवृत्त अधिकाऱ्याची सायबर भामट्यांकडून १.८३ कोटींची फसवणूक
मुंबई, ता. २० ः मुलुंड येथे वास्तव्यास असलेल्या सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला १८ दिवस आभासी अटकेत ठेवले. तसेच सायबर भामट्यांनी १.८३ कोटी रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भामट्यांनी संपूर्ण कुटुंबीयांच्या नावे असलेली मालमता, बँकेतील जमा, ठेवी, खरेदी केलेले समभाग, सोनेनाणे आदी सर्व तपशील लेखी घेतले. या कुटुंबाला मुदत ठेवी मोडण्यास, सोने विकण्यास, गहाण ठेवण्यास भाग पडले. या १८ दिवसांमध्ये घरातील एका खोलीत या कुटुंबाला बंदिस्त राहण्यास भाग पाडले. तसेच तक्रारदाराच्या पत्नीस व्हॉट्सॲप कॉल सुरू ठेवून दर दोन तासांनी अपडेट घेतले जात होते. ६२ वर्षीय तक्रारदार नामांकित बँकेत व्यवस्थापक होते. तर त्याच्या पत्नी एलआयसीत अधिकारी, तर कन्या खासगी कंपनीत नोकरी करते.
आधार कार्डचा वापर करून तक्रारदाराच्या नावे सिम कार्ड घेण्यात आले. त्या सिम कार्डआधारे धमकीचे, आक्षेपार्ह मेसेज घाटकोपर परिसरात पाठवण्यात आले. त्याबाबत घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. याशिवाय या सिम कार्ड व बँक खात्याद्वारे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाच्या गोपनीय आदेशांद्वारे मुंबई गुन्हे शाखा, केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालयाद्वारे (ईडी) सुरू आहे, अशी भीती घालण्यात आली.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सर्व जमापुंजी सांगू त्या खात्यावर वळती करावी लागेल. तपास पूर्ण झाल्यावर निर्दोष ठरल्यास ही सर्व रक्कम परत केली जाईल, असे तक्रारदारास सांगण्यात आले होते; मात्र १४ ते ३१ जानेवारीदरम्यान १.८३ कोटी भामट्यांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांवर जमा केल्यानंतर हे कुटुंब आभासी अटकेतून सुटले. त्यानंतर ११ फेब्रुवारीपर्यंत सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांच्या वेशातील भामटे या कुटुंबाच्या संपर्कात होते; मात्र त्यानंतर या सर्वांचे फोन अचानक बंद झाले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने कुटुंबाने तक्रार दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सायबर पोलिस (पूर्व विभाग) तपास करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

