मुंबईच्या हवेचा दर्जा पुन्हा खालावला; कांदिवली, वरळीत प्रदूषणाचा विळखा
मुंबईच्या हवेचा दर्जा पुन्हा खालावला
कांदिवली, वरळीस प्रदूषणाचा विळखा; एक्यूआय १५०च्या उंबरठ्यावर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकर मोकळा श्वास घेता येत असताना आता पुन्हा एकदा मुंबईच्या हवेतील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. शनिवारी (ता. २१) मुंबईचा सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १४५ वर पोहोचला आहे. शहराच्या अनेक भागांत हवेचा दर्जा मध्यम ते वाईट या श्रेणींत नोंदवला गेला आहे. विशेषतः कांदिवली आणि वरळी परिसरातील परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. तेथील निर्देशांकाने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
हवामान विभागाच्या आणि समीर प्रणालीच्या आकडेवारीनुसार, गेल्या ४८ तासांत प्रदूषणात झपाट्याने वाढ झाली आहे. २० फेब्रुवारीला १३०वर असलेला निर्देशांक शनिवारी १४५वर पोहोचला आहे. हवेत प्रामुख्याने ओझोन या घटकाचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. थंडी ओसरून उन्हाचा चटका वाढत असताना जमिनीलगतच्या हवेत बदल झाल्याने प्रदूषणाचे कण साचल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
आरोग्यासाठी अत्यंत घातक
मुंबईतील २६ सक्रिय केंद्रांपैकी कांदिवली पूर्व येथे सर्वाधिक २५० एक्यूआयची नोंद झाली आहे, जी आरोग्यासाठी अत्यंत घातक मानली जाते. त्यापाठोपाठ वरळी परिसरातही निर्देशांक २०१वर पोहोचला आहे. दक्षिण मुंबईत प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली आहे. वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), मालाड आणि देवनार या भागांतही हवेचा दर्जा खालावलेला आहे.
काळजी घेण्याचे आवाहन
हवेचा दर्जा खालावल्यामुळे श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांना, विशेषतः दमा आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो. तसेच हृदयविकार असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी आणि लहान मुलांनी प्रदूषित काळात काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.
मुंबईतील विविध परिसरांतील हवेचा दर्जा
परिसर / एक्यूआय / स्तर
कांदिवली पूर्व - २५० - वाईट
वरळी - २०१ - वाईट
वांद्रे - कुर्ला संकुल (बीकेसी) - १७९ - मध्यम
मालाड पश्चिम - १७३ - मध्यम
देवनार - १७० - मध्यम
कुलाबा - १६९ - मध्यम
घाटकोपर - १५७ - मध्यम
माझगाव - १५४ - मध्यम
बोरीवली पूर्व - १३८ - मध्यम
सायन - ६५ - समाधानकारक
..........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

