कचरामुक्त मुंबईकडे वाटचाल
कचरामुक्त मुंबईकडे वाटचाल
रस्ते स्वच्छता योजनेत महिलांचा सहभाग; संस्थांची नियुक्ती होणार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : मुंबईतील रस्त्यांची स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी आणि महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. विशेषतः आर-सेंट्रल (बोरिवली) वॉर्डसह मुंबईतील विविध वॉर्डांमध्ये रस्ते स्वच्छता योजना आणि महत्त्वाकांक्षी ‘पिंक आर्मी’ अंतर्गत काम करण्यासाठी संस्थांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या कामासाठी पालिकेने स्वारस्य अभिव्यक्ती मागवली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ फेब्रुवारी २०२६ आहे.
मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई अभियानाचा एक भाग म्हणून ‘पिंक आर्मी’ची संकल्पना राबवण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने महिला बचत गटांना आणि महिला संस्थांना स्वच्छतेच्या कामात प्राधान्य दिले जाते. याअंतर्गत महिला सक्षमीकरणा भर दिला जात असून, महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, रस्त्यांवरील कचरा, कोपरे आणि पदपथांची बारकाईने स्वच्छता करणे यासाह गुलाबी गणवेशात सज्ज असलेल्या या महिला पथकामुळे स्वच्छतेच्या कामात एक शिस्त आणि नवी ओळख निर्माण झाली आहे.
बोरिवली आणि परिसराचा समावेश असलेल्या आर-सेंट्रल वॉर्डमध्ये लोकसंख्येची घनता जास्त असल्याने येथे स्वच्छतेचे मोठे आव्हान असते. या योजनेअंतर्गत नियुक्त होणाऱ्या संस्थांना या विभागातील रस्ते, गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणांच्या दैनंदिन स्वच्छतेची जबाबदारी सोपवली जाईल.
पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ही प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुक संस्थांना आणि महिला बचत गटांना त्यांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी उद्या (ता. २३) पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. संस्थांची निवड करताना त्यांचा अनुभव, कामाची क्षमता आणि मनुष्यबळ या निकषांचा विचार केला जाईल.
पिंक आर्मीमुळे मुंबईच्या स्वच्छतेत महिलांचा सहभाग वाढला आहे. आर-सेंट्रल वॉर्डसह इतर महत्त्वाच्या विभागांमध्ये या उपक्रमामुळे दृश्य बदल पाहायला मिळतील, असे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
प्रकल्पाची उद्दिष्टे
१. मुंबईला ‘कचरामुक्त शहर’ बनवणे.
२. यंत्रांच्या सोबतीने मानवी श्रमाचा (विशेषतः महिलांचा) प्रभावी वापर करणे.
३. सूक्ष्म स्तरावर स्वच्छतेचे नियोजन करणे.

