फ्लाईंग किस देणे पडले महागात
फ्लाइंग किस देणे पडले महागात
आरोपीला तीन वर्ष कारावासासह तीन हजारांचा दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : नऊ वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग आणि लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली एका आरोपीला विशेष न्यायालयाने नुकतेच दोषी ठरवले आहे. त्याला तीन वर्षे कारावास तसेच तीन हजार रुपयांचा दंड ठोठावला. सध्या हा आरोपी विवाहित असून, तीन महिन्यांच्या मुलाचा पिता आहे.
एका हळदीच्या कार्यक्रमात नाचताना केलेला हावभाव, त्याला फ्लाइंग किस समजल्याचा दावा आरोपीच्या वतीने करण्यात आला. पीडितेने त्याचा हा दावा फेटाळून लावला होता. तथापि, ‘फ्लाइंग किस’ देणे हे लैंगिक स्वरूपाचे हावभाव असून, त्यामुळे पीडितेचा सन्मान भंग होतो. ते लैंगिक छळाच्या कृत्यात मोडते, असे निरीक्षण न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवताना नोंदवले. दुसरीकडे, पीडितेच्या आईला माहिती देणारा शेजारी हा आपला नातेवाईक असून, त्याच्यासोबत कौटुंबिक वाद असल्यामुळे त्याने आपल्याविरोधात खोटे आरोप केल्याचा दावा आरोपीकडून करण्यात आला, परंतु आरोपीच्या कुटुंबीयांचे त्या शेजाऱ्यांशी आधी कोणतेही वैर नव्हते. तसेच कोणतेही पालक शेजाऱ्यांसाठी त्यांच्या मुलीची प्रतिष्ठा मलीन अथवा धोक्यात घालणार नाहीत, असेही निरीक्षण न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावताना नोंदवले.
काय प्रकरण?
नऊ वर्षांपूर्वी, म्हणजेच ३१ जानेवारी २०१७ ला एका हळदीच्या कार्यक्रमादरम्यान, तेव्हा १९ वर्षीय आरोपीने अल्पवयीन मुलीला फ्लाइंग किस दिला. एका शेजाऱ्याने पीडितेच्या आईला याबद्दल माहिती दिली. तेव्हा, पीडितेने याआधीही आरोपी ट्यूशन क्लासेसला जात असताना तिचा पाठलाग करीत आला आणि तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे ओढल्याची आपबिती सांगितली. घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला तिच्या पालकांना सांगितले नाही. तिच्या वडिलांनी आरोपीसह त्याच्या आईला घरी बोलावून या समस्येवर तोडगा काढून त्याला आपल्या मुलीपासून दूर राहण्यास सांगितले. तथापि, आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी पीडितेच्या कुटुंबाशी वाद घातल्यामुळे आरोपीविरुद्ध प्राथमिक माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

