लालबागच्या राजाचा शैक्षणिक क्रांतीचा ''श्रीगणेशा''; देशातील पहिले ''एआय डिजिटल ग्रंथालय'' सज्ज

लालबागच्या राजाचा शैक्षणिक क्रांतीचा ''श्रीगणेशा''; देशातील पहिले ''एआय डिजिटल ग्रंथालय'' सज्ज

Published on

‘लालबागच्या राजा’चा शैक्षणिक क्रांतीचा ‘श्रीगणेशा’; देशातील पहिले ‘एआय डिजिटल ग्रंथालय’ सज्ज
​२४ फेब्रुवारीला डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते उद्घाटन; स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी पर्वणी

​सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे केवळ धार्मिक उत्सवासाठीच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ओळखले जाते. याच परंपरेला आधुनिकतेची जोड देत मंडळाने आता ९२व्या वर्षात विद्यार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ‘लालबागचा राजा (एआय) डिजिटल ग्रंथालय’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला असून, याचा उद्घाटन सोहळा मंगळवारी (ता. २४) पार पडणार आहे.

​लालबाग येथील ‘पेरू चाळ’ परिसरातील लालबागचा राजा प्रबोधिनीमध्ये हे अद्ययावत ग्रंथालय साकारण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांच्या हस्ते या ग्रंथालयाचे लोकार्पण होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, माजी महापौर किशोरी पेडणेकर (नगरसेविका) आणि किरण तावडे उपस्थित राहणार आहेत.

​हे ग्रंथालय केवळ पुस्तकांचा संग्रह नसून, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चालणारे एक ज्ञानकेंद्र आहे. स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हे ग्रंथालय पूर्णपणे विनामूल्य असेल. एआय तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती, संदर्भ आणि जागतिक दर्जाची ई-पुस्तके एका क्लिकवर उपलब्ध होतील.
​डिजिटल युगात तरुणाईला पुन्हा वाचनाकडे वळवण्यासाठी आणि त्यांना जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी हे व्यासपीठ मदतीचे ठरेल.

​गेल्या नऊ दशकांपासून मंडळ शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. आताच्या तंत्रज्ञानाच्या युगात आमचा विद्यार्थी मागे पडू नयेत, या उद्देशाने आम्ही हे एआय डिजिटल ग्रंथालय सुरू करत आहोत. हे मुंबईतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे नवीन दालन असेल, असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.

​मंडळाने यापूर्वी रुग्णवाहिका सेवा, डायलिसिस सेंटर, शैक्षणिक शिष्यवृत्ती आणि आपत्तीग्रस्तांना मदत अशा अनेक उपक्रमांतून आदर्श निर्माण केला आहे. आता ‘डिजिटल लायब्ररी’च्या माध्यमातून मंडळाने शिक्षणाच्या क्षेत्रात हाय-टेक झेप घेतली आहे. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी आणि खजिनदार मंगेश दळवी यांनी या ऐतिहासिक सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
.........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com