रजोनिवृत्ती मार्गदर्शन केंद्रांचे राज्यस्तरीय लोकार्पण
रजोनिवृत्ती मार्गदर्शन केंद्रांचे राज्यस्तरीय लोकार्पण
२३ जणांना आरोग्यरत्न, १७४ जणांना महाआरोग्य सन्मान
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ सोहळा यशवंतराव चव्हाण केंद्र येथे रविवारी ( ता. २२) उत्साहात पार पडला. सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच या वेळी रजोनिवृत्ती मार्गदर्शन केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले.
या सोहळ्यात २३ जणांना आरोग्यरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यामध्ये एक लाख रुपये, प्रशस्तिपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच, दुर्गम भागात सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका आणि आशा स्वयंसेविका अशा १७४ गुणवंतांना महाआरोग्य सन्मान प्रदान करण्यात आला.
या वेळी व्यासपीठावर आमदार राजू खरे, मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, आरोग्य सचिव ई. रवींद्रन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या आरोग्यविषयक व्हिडिओंचे आणि आरोग्य दिनदर्शिकेचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.
महत्त्वाचे नवे उपक्रम
कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा रजोनिवृत्ती मार्गदर्शन केंद्र उपक्रमाचे राज्यस्तरीय लोकार्पण करण्यात आले. राज्यातील ५८० ठिकाणी असे रजोनिवृत्ती मार्गदर्शन केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. दर बुधवारी येथे रजोनिवृत्ती काळातील महिलांना मोफत समुपदेशन व उपचार मिळतील. असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. यासोबतच, असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना घरपोच सेवा देण्यासाठी ‘महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर’ कार्यक्रमाचीही सुरुवात करण्यात आली.
‘आरोग्य कर्मचारी हेच देवदूत’
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या भाषणात आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, आमचे डॉक्टर आणि कर्मचारी समर्पित भावनेने काम करत असून, ते सामान्य जनतेसाठी देवदूत ठरत आहेत. राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आशा स्वयंसेविकांचा उल्लेख आरोग्याचा कणा असा केला आणि जोनिवृत्ती मार्गदर्शन केंद्रे महिलांमधील संकोच दूर करण्यास मदत करतील, असा विश्वास व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

