पालिकेत बनावट भरती रॅकेट?
पालिकेत बनावट भरती रॅकेट?
सांगली, सातारा, कोल्हापूरमधील ४३ तरुणांची फसवणूक; गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ ः मुंबई महापालिकेत नोकरी लावण्याचे प्रलोभन दाखवत राज्यातील अनेक तरुणांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीविरोधात कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील ४३ तरुणांनी तक्रार केली असून, राज्यातील विविध जिल्ह्यांतून या टोळीविरोधात तक्रारी प्राप्त होतील, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
तक्रार देणाऱ्या ४३ तरुणांनी या टोळीला एकूण ३३ लाखांचा गंडा घातला असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. टोळीतील प्रमुख आरोपी महिला असून, महापालिकेत शिपाई पदावर नियुक्त असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याचे समजते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीचे शेतकरी अनिलकुमार गोंजारी (५०) २०२४मध्ये नातेवाइकांमार्फत माया चव्हाण (५९) नावाच्या महिलेच्या संपर्कात आले. या महिलेने पालिकेच्या एल विभाग कार्यालयात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत असल्याचे भासवले. पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगली ओळख असून शिपाई, लिपिक, हेड क्लार्क अशा विविध पदांवर नोकरी मिळवून देऊ शकते, असा दावा तिने केला. तिचे बोलणे ऐकून प्रभावित झालेले गोंजारी यांनी आपल्या मुलांसाठी पालिकेच्या नोकरीसाठी मायाला संपर्क करू लागले.
सुरुवातीला माया आणि तिच्या साथीदारांनी अर्ज शुल्काचे निमित्त करून या सर्वांकडून प्रत्येकी १० हजार रुपये रोख रक्कम घेतली. त्यानंतर घाटकोपरच्या पारेख या खासगी रुग्णालयात उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली. तेव्हा उमेदवारांकडून प्रत्येकी १० हजार रुपये रोख स्वरूपात घेतले. ऑगस्ट २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत टोळीने उमेदवारांकडून ३३ लाख रुपये उकळले. मात्र बरेच महिने लोटले तरी नोकरीचे काम होत नाही, म्हणून गोंजारी यांनी प्रत्यक्ष एल विभाग कार्यालयाताबाबत चौकशी केली. तेव्हा त्या घनकचरा विभागातील शिपाई असल्याचे तर अन्य आरोपी पालिकेचे अधिकारी नाहीत, अशी माहिती त्यांना मिळाली.
प्रतिज्ञापत्र देऊनही पैसे परत नाहीत
गोंजारी यांनी आरोपींना जाब विचारला असता आरोपींनी प्रतिज्ञापत्र करून सर्व पैसे परत करण्याची हमी दिली. त्यानंतरही पैसे न मिळाल्याने गोंजारी यांनी एल विभाग कार्यालयात मायाविरोधात तक्रार दिली. त्यांना याबाबत पोलिस तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार त्यांनी कुर्ला पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी २० फेब्रुवारीला गुन्हा नोंदवला.
परीक्षा नाही, थेट नियुक्ती!
या भेटीत नोकरीसाठी पदानुसार १.७० लाख ते २.५० लाख खर्च अपेक्षित असल्याचे त्यांना सांगण्यात आले. आमच्यामार्फत अर्ज केल्यास लेखी परीक्षा, मुलाखत इत्यादी प्रक्रिया नसेल. थेट नियुक्तीपत्र देण्यात येईल, असे आरोपींनी सांगितले. त्यामुळे गोंजारी यांनी सांगली, सातारा तसेच कोल्हापूर येथील नातेवाईक, मित्रांना त्यांच्या मुलांसाठी पालिकेत नोकरीच्या संधीबाबत माहिती दिली. त्यातून सुमारे ४३ उमेदवार तयार झाले.
एल विभाग कार्यालयात भेट
काही दिवसांनी मायाने त्यांना एल विभाग कार्यालयात भेटण्यासाठी बोलावले. तेथे मायाचा भाऊ प्रथमेश चव्हाण, सुरेंद्र गुरव, राहुल जाधव या व्यक्तींसोबत तक्रारदाराची भेट झाली. या सर्वांनी स्वतःला पालिकेचे अधिकारी असल्याचे भासवले. त्यांच्या गळ्यात पालिकेचे ओळखपत्र होते. त्यावर अभियंता असे पदनामही नमूद होते. त्यामुळे गोंजारी यांचा या टोळीवर विश्वास बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

