सुरांच्या सान्निध्यात वाढलं मातृत्व कामा रुग्णालयात स्तनदा मातांना संगीत थेरपीचा लाभ

सुरांच्या सान्निध्यात वाढलं मातृत्व कामा रुग्णालयात स्तनदा मातांना संगीत थेरपीचा लाभ

Published on

सुरांच्या सान्निध्यात वाढलं मातृत्व
कामा रुग्णालयात स्तनदा मातांना संगीत थेरपीचा लाभ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २३ : आईच्या मनातील ताण कमी झाला, तर स्तनदुधाचा प्रवाह वाढतो, या शास्त्रीय निष्कर्षाला मुंबईतील कामा अँड अल्बलेस रुग्णालयाच्या अभ्यासातून ठोस आधार मिळाला आहे. रुग्णालयातील मानवी दूधपेढीत स्तनदूध काढताना शांत वाद्यसंगीताचा वापर केल्यानंतर दुधाच्या संकलनात लक्षणीय वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे.
प्रसूतीनंतर अनेक मातांना ताण, चिंता आणि भावनिक अस्थिरतेचा सामना करावा लागतो. याचा थेट परिणाम दूधनिर्मितीवर होतो. ही बाब लक्षात घेऊन जुलै २०२४ पासून रुग्णालयात ‘सायलेंट म्युझिक थेरपी’चा प्रयोग सुरू करण्यात आला. स्तनदूध काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान शांत संगीत वाजविण्यात येऊ लागले. त्यानंतर दुधाच्या प्रमाणात सातत्याने वाढ नोंदवली गेली. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, स्तनदुधाची निर्मिती ‘प्रोलॅक्टिन’ आणि ‘ऑक्सिटोसिन’ या संप्रेरकांवर अवलंबून असते. प्रोलॅक्टिन दूधनिर्मितीस मदत करते, तर ऑक्सिटोसिन दूध बाहेर पडण्यास कारणीभूत ठरते. ताणतणाव वाढल्यास या संप्रेरकांवर विपरीत परिणाम होतो. संगीतामुळे मेंदूतील ताण कमी होतो, कॉर्टिसोलचे प्रमाण घटते आणि शरीरातील ‘रेस्ट अँड डाइजेस्ट’ प्रणाली सक्रिय होते. त्यामुळे ऑक्सिटोसिनचे स्त्रवण वाढून दुधाचा प्रवाह सुलभ होतो.
---------------------
संगीत थेरपीचा फायदा
आकडेवारीनुसार, २०२३ ते २०२४ दरम्यान दूध संकलन २,७३,०७० मिलिलिटरवरून ४,१५,६६१ मिलिलिटरपर्यंत वाढले, म्हणजे सुमारे ५२.२ टक्के वाढ झाली. २०२४ ते २०२५ दरम्यान ते ५,२०,९१८ मिलिलिटरपर्यंत पोहोचले, म्हणजे २५.३ टक्के वाढ पाहण्यास मिळाली, तर २०२३ ते २०२५ या कालावधीत एकूण ९०.८ टक्के वाढ नोंदवली गेली. दूध वितरणातही वाढ झाली आहे. २०२३ ते २०२४ मध्ये ५४.८ टक्के, तर २०२४ ते २०२५ मध्ये २१.२ टक्के वाढ झाली. एकूण वाढ ८७.७ टक्के आहे. जुलै २०२४ पासून संगीत थेरपी सुरू झाल्यानंतर वाढीचा वेग अधिक ठळक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
--------------
संगीत थेरपी हा केवळ भावनिक आधार नसून तो न्यूरो-हॉर्मोनल प्रक्रियेशी संबंधित आहे. आई शांत झाली की दूधनिर्मिती नैसर्गिकरीत्या सुरळीत होते. आमच्या मानव दूध बँकेत संगीताचा समावेश केल्यानंतर दुधाच्या प्रमाणात सातत्याने वाढ दिसून आली.
-डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक

Marathi News Esakal
www.esakal.com