भागीदारीत टोल नाका चालवणार?
वयोवृद्ध व्यावसायिकाला ६५ लाखांचा गंडा
मुंबई, ता. २४ ः मंत्र्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे भासवणाऱ्या एका भामट्याने आपल्याला नवी मुंबईतील टोल कंत्राट मिळणार आहे, असे अंधेरीत राहणाऱ्या वयोवृद्ध व्यावसायिकाला सांगितले. हा व्यवसाय भागीदारीत करण्याचे प्रलोभन दाखवत त्याला ६५ लाख रुपयांना फसवले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ८० वर्षीय वृद्धाने अंधेरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्याच्या तक्रारीच्या आधारे अरुण सिंग या व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास हटकर असे तक्रारदार वृद्धाचे नाव असून ते. खासगी कंपनीतून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी लेबर कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय सुरू केला. पश्चिम उपनगरातील ओळखीच्या जोरावर त्यांनी इस्टेट एजन्सीही सुरू केली. २०१४ मध्ये मालमत्तेच्या व्यवहारातून त्यांची ओळख सिंग सोबत झाली.
व्यवहार पूर्ण झाल्यावरही सिंग आणि हटकर संपर्कात राहिले. दोघांमध्ये मैत्री झाली. काही महिन्यांनी सिंगने मंत्रालयात अधिकारी आणि मंत्र्यांसोबत घनिष्ठ संबंध असल्याचे भासवले. वाशी येथील टोलनाका संचलनाचे कंत्राट मिळणार आहे. मात्र, त्यासाठी आवश्यक असलेली गुंतवणूक एकट्याला करणे शक्य नाही. कोणी गुंतवणूकदार असल्यास सांगा, अशी विनंती त्याने हटकर यांच्याकडे केली. तेव्हा हटकर यांनी या कंत्राटातील अपेक्षित गुंतवणूक, फायदा आधी बारकावे समजून घेत स्वतःच गुंतवणूक करण्याचे ठरवले.
त्यानंतर टप्प्याटप्याने सिंगने हटकर यांच्याकडून ६५ लाख रुपये गुंतवणूक रक्कम म्हणून घेतले. दोनेक वर्षे विविध निमित्त करून वेळ काढल्यानंतर कोविड काळ सुरू झाला. त्यामुळे हटकर यांनी महामारी आटोक्यात आल्यानंतर २०२२ पासून सिंगकडे कंत्राट कधी मिळणार, काम कधी सुरू होणार असे प्रश्न सुरू केले. कंत्राट मिळणार नसेल, तर गुंतवलेली रक्कम परत करण्याची विनंतीही केली. मात्र, सिंग याने पुन्हा नवी निमित्ते शोधून वेळ काढण्यास सुरुवात केली.
बरीच वाट पाहून हटकर सिंग याच्या ठाणे येथील कार्यालयात गेले. ते बंद आढळले. त्याचे घर गाठले तेव्हा त्याने हटकर यांना उडवून लावले. त्यानंतर त्याने हटकर यांच्यासोबतचा संपर्क तोडला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गेल्या आठवड्यात तक्रार दिली. त्या आधारे सिंगविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

