

दुकानांच्या ई-लिलावाने शिवशाही मालामाल
१६ कोटी ५० लाख रुपयांचा महसूल; दोन दुकानांना अडीच पट किंमत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : शिवशाही पुनर्वसन प्रकल्प व्यावसायिक दुकानांच्या विक्रीतून मालामाल झाला आहे. शिवशाहीने ई-लिलावात समावेश केलेल्या मानखुर्द आणि शिवडी येथील एकूण ३० दुकानांची किमान निश्चित किंमत १० कोटी रुपये असतानाही लिलावातून त्यांना तब्बल साडेसोळा कोटी रुपये मिळणार आहेत. लिलावामध्ये समावेश केलेल्या दोन दुकानांना सर्वाधिक अडीच पट किंमत मिळाली आहे. यावरून मुंबईतील व्यावसायिक दुकानांना असलेली मागणी अधोरेखित होत आहे.
शिवशाहीचे मानखुर्द आणि शिवडी येथे व्यावसायिक गाळे आहेत. त्याची ई-लिलावाच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी निविदा जाहीर केली होती. त्यानुसार ३० दुकानांसाठी जवळपास ११४ जणांनी नोंदणी करीत लिलावात सहभाग घेतला होता. त्यानुसार गुरुवारी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेचा निकाल प्रशासनाने जाहीर केला आहे. त्यामध्ये सर्व दुकानांची विक्री झाल्याचे स्पष्ट झाले असून, एकूण १६ कोटी ५० लाख रुपयांची किंमत मिळणार आहे. दरम्यान, मानखुर्द येथील १५ लाख रुपये किंमत असलेल्या दुकानाला सर्वाधिक ४१ लाख २५ हजार रुपयांची किमत मिळाली. तर शिवडी येथील ३३ लाख ९२ हजार रुपये किमान निश्चित किंमत असलेल्या दुकानाला ८८ लाख ९० हजार रुपये एवढी किंमत मिळाली आहे. त्यामुळे शिवशाहीला मोठा आर्थिक आधार मिळाला असून, वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या दुकानांचा प्रश्न मार्गी लागला आहे.
देकार पत्र देणार
लिलाव प्रक्रियेत विजेते ठरलेल्या अर्जदारांना शिवशाहीकडून आता देकार पत्र पाठवले जाणार आहे. तसेच त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची तपासणी करून दुकानाचा ताबा देण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे शिवशाहीच्या अधिकाऱ्याने सांगितले.
...तर अनामत रक्कम जप्त
लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी शिवशाहीने संबंधित दुकानाच्या किमतीच्या १० टक्के रक्कम अनामत म्हणून भरून घेतलेली आहे. त्यामुळे आता ज्या अर्जदाराने लिलाव जिंकला आहे त्याने दुकान घेण्याबाबत असमर्थता दर्शविल्यास त्याची अनामत रक्कम जप्त केली जाईल. तसेच दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अर्जदाराला संधी दिली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.