साहित्य संस्कृती मंडळाचा ४२ ग्रंथांचा नजराणा

साहित्य संस्कृती मंडळाचा ४२ ग्रंथांचा नजराणा

Published on

साहित्य संस्कृती मंडळाचा ४२ ग्रंथांचा नजराणा
मराठी भाषादिनी नाशिकमध्ये प्रकाशन

मुंबई, ता. २४ ः मराठी साहित्य विश्वात अत्यंत दर्जेदार ग्रंथसंपदेचे प्रकाशन करून ती मराठी वाचकांना उपलब्ध करून देणाऱ्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने यंदा मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने तब्बल ४२ ग्रंथांचा नजराणा आणला आहे. या अत्यंत मौलिक ग्रंथांचे २७ फेब्रुवारीला नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयात मोठ्या दिमाखदार सोहळ्यात प्रकाशन होणार असल्याची माहिती मंडळाच्या सचिव डॉ. मीनाक्षी पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायातील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी लिहिलेल्या ‘तुकारामबावांच्या अभंगाची गाथा’ हा ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासोबतच अंजली मालकर यांनी लिहिलेल्या ‘हिंदुस्थानी अभिजात संगीताचा इतिहास’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर-कर्तृत्वाचा एक शोध’ खंड-१, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे समग्र वाङ्‍मय खंड-२ व खंड ३ प्रकाशित होत आहेत. तिसऱ्या खंडामध्ये दर्पणकार जांभेकर यांनी प्रथम मुद्रित केलेली ‘ज्ञानेश्वरी’ आहे. यासोबतच ‘शिवशक्ती संप्रदायाची लोक-गान परंपरा’ ‘महाराष्ट्राचे शिल्पकार विद्वत्तेचा महामेरू डॉ. सी. डी. देशमुख’, ‘मराठीतील रहस्य-रंजनप्रधान, लोकप्रिय कादंबरी परंपरा आणि प्रवाह’, ‘ओद्रमागधी ते ओडिसी नृत्य एक प्रवास’, ‘ज्ञानेश्वरीची प्रस्तावना आणि ज्ञानेश्वरीतील मराठी भाषेचे व्याकरण’ आदी ग्रंथांचा समावेश आहे.
यंदा प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथमालिकेत ‘बा. सी. मर्ढेकर नवकवितेचे जनक’, ‘योद्धा साहित्यिक अण्णाभाऊ साठे‘, ‘ग्रेस गूढ इथले संपत नाही...’, ‘तळपती तलवार नारायण सुर्वे’, ‘साहित्यातील अंगार अमर शेख’, ‘महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे’, ‘सुरेश भट रंग यांचा वेगळा’, ‘मराठी साहित्यातील अढळ तारा नामदेव ढसाळ’, ‘ज्ञानपीठविजेते विंदा करंदीकर’ व ‘विदुषी : दुर्गा भागवत’ या ग्रंथांचा समावेश आहे. तसेच ‘गीतार्णव’, ‘रायगडची जीवनकथा’, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार डॉ. आप्पासाहेब पवार’, ‘नारायण वामन टिळक : व्यक्ती आणि वाङ्‍मय’, ‘सान्वय सार्थ सटीक श्रीमद्भगवद्गीता’, ‘लोकमहर्षी भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख गौरव ग्रंथ’, ‘मोगल दरबारची बातमी पत्रे खंड दुसरा’, ‘दलित साहित्य : एक अभ्यास’, ‘कर्मयोगी बसवण्णा’, ‘महाराष्ट्राचे शिल्पकार शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे’, ‘स्त्रियांची ओवीगीते : साज आणि स्वरूप’ इत्यादी ग्रंथांचा समावेश असल्याची माहितीही डॉ. पाटील यांनी दिली.
...
नवलेखकांची १९ पुस्तके
‘नवलेखक अनुदान’ योजनेतील ‘माणसाच्या उत्क्रांतीची गोष्ट’ लेखक समाधान निकम, ‘प्रेमांकुर’ लेखक राजू आठवले, ‘अभोगी रोजगाराचा हंगाम’ लेखक श्रीकांत साव, ‘हे बंध रेशमाचे’ लेखक स्मिता मोने, ‘गझल फुलोरा’ लेखक वंदना सोरते, ‘ग्रामरंग’ लेखक सोनल इचाळे, ‘बाप’ लेखक राजन पोळ, ‘संकोचलेली मनं’ लेखक उज्ज्वल कुलकर्णी, ‘चक्रव्यूह’ लेखक रमेश बोराडे, ‘मधुमाला’ लेखक मधुसूदन भिसे, ‘माती म्हणे आभाळाला’ लेखक गणेश खरात, ‘आता गायचे नव्याने...’ लेखिका पुष्पा कोल्हे, ‘जेव्हा ती बोलू लागते’ लेखिका सुरेखा पैठणे, ‘मातीतून उगवलेल्या कविता’ लेखक संतोष गाढवे, ‘निर्णय’ लेखक डॉ. शुभंकर कुलकर्णी, ‘एक वर्तुळ पूर्ण झाले...’ लेखिका प्राजक्ता राजदेरकर, ‘आजीचा बटवा आणि इतर गोष्टी’ लेखक नवनाथ उगवे, ‘किरणोत्सव’ लेखक किरण शार्दूल व ‘कर्मचक्र’ लेखक मारुती वाघ ही १९ पुस्तके मंडळाकडून प्रकाशित होत आहेत.
...
विनामूल्य उपलब्ध
हे सर्व ग्रंथ मंडळाच्या sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर वाचकांसाठी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच ते अत्यल्प दरात शासकीय मुद्रणालयाच्या ग्रंथागारांमध्ये तसेच खासगी वितरकांकडेही उपलब्ध आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com